By प्रतिक यादव
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेने नुकतीच जाहीर केलेल्या नवीन प्रभाग रचना व सीमांकनासंदर्भात हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर माजी महापौर सागर नाईक यांच्या नेतृत्वाखाली माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक (आताचे भाजप नेते) तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक उपायुक्त डोईफोडे यांची भेट घेऊन आपली हरकती व सूचना नोंदविल्या.
विद्यार्थीदशेपासूनच सक्रिय असलेल्या सागर नाईक यांनी मॉडर्न कॉलेज व आयसीएलमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थी चळवळीमध्ये पुढाकार घेतला होता. कमी वयातच त्यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. दोन वेळा महापौरपद भूषवणारे नाईक हे नवी मुंबईतील तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
नवीन प्रभाग रचनेबाबत नोंदविलेल्या सूचनांमुळे ते पुन्हा सक्रिय राजकारणात परतल्याचे संकेत मिळत असून, आगामी पालिका निवडणुकीत भाजपकडून त्यांना जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत तरुण कार्यकर्त्यांमध्ये सागर नाईक यांचे चांगले संपर्कजाळे आहे. राजकारणात असूनही वैयक्तिक नातेसंबंध जपल्यामुळे मित्रपरिवाराचा त्यांना ठाम पाठिंबा मिळणार, असा विश्वास व्यक्त केला जातो. विशेषतः त्यांचे जिवलग सहकारी विजय साळे यांच्यासह अनेक जण आगामी निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभे राहतील, अशी अपेक्षा आहे.
येत्या पालिका निवडणुकीत सागर नाईक किती जागा भाजपच्या झोळीत टाकतात, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला निश्चितच होईल, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.