मुंबई: वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीसोबतच ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ची सोय करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ही सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे ‘पॉड टॅक्सी’ संदर्भात आयोजित बैठकीत दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की, कुर्ला ते बांद्रा रेल्वे स्थानकांदरम्यानच्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. भविष्यात बुलेट ट्रेन स्टेशन आणि मुंबई उच्च न्यायालय यामुळे या भागातील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे विद्यमान परिवहन सेवांवर ताण येण्याची शक्यता असून, ‘पॉड टॅक्सी’ नागरिकांसाठी सोयीस्कर पर्याय ठरू शकेल.
मुंबईत सर्व परिवहन सेवांसाठी एकाच कार्डाद्वारे प्रवास करण्याची व्यवस्था होत आहे. त्याच कार्डाद्वारे ‘पॉड टॅक्सी’ची सुविधा मिळावी, यासाठी कार्यवाही करावी, असेही फडणवीस म्हणाले. या प्रकल्पाच्या अनुषंगाने कुर्ला स्थानक व बांद्रा परिसराचा विकास करावा. कुर्ल्यातील पोलिस निवासासाठी पर्यायी जागा देऊन त्या जागेचा वापर करावा, तसेच बीकेसी परिसरातील इमारती ‘पॉड टॅक्सी’द्वारे स्थानकांशी जोडाव्यात, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
या भागाच्या व्यावसायिक महत्त्वाचा विचार करून सेवा जागतिक दर्जाची असावी, तसेच स्टेशनबाहेरील स्कायवॉकचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर व्हावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीस मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता आणि गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग उपस्थित होते. या वेळी मुखर्जी आणि भारती यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.