मुंबई: कांदिवली (पू.) मधील ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थ्यांवर अवैध फी दंड, एकरकमी फी भरण्याचा आग्रह आणि भ्रम निर्माण करणारी प्लेसमेंट माहिती दिल्याचा गंभीर आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) प्राचार्यांना निवेदन दिलं. तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
ABVP च्या निवेदनानुसार, महाविद्यालयाच्या प्रशासनाने घेतलेले काही निर्णय शासनाच्या धोरणांच्या विरोधात असून विद्यार्थ्यांवर अनावश्यक आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण करणारे आहेत.
ABVP ने केलेले आरोप असे :
1: उशीरा फी भरण्यास 100 रुपये ते 10,000 रुपयापर्यंत अवाजवी दंड
विद्यार्थ्यांनी फी उशिरा भरल्यास 100 रुपयांपासून 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक दंड आकारला जातो, असा आरोप ABVP ने केला आहे.
संघटनेच्या मते, इतक्या उच्च दंडाची तरतूद शासनाच्या नियमांमध्ये नाही आणि हा व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
2: हप्त्यांमध्ये फी भरण्याच्या सुविधेस नकार
महाविद्यालयाकडून फी हप्त्यांमध्ये भरू देण्यास नकार दिल्याने अनेक विद्यार्थ्यांवर आर्थिक संकट ओढवल्याचे निवेदनात नमूद आहे.
“एकदम संपूर्ण फी भरण्यास भाग पाडणे हा विद्यार्थ्यांवर मानसिक आणि आर्थिक दबाव आहे,” असा आरोप ABVP ने केला आहे.
3: प्लेसमेंटबाबत दिशाभूल
ABVP ने आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, “मोठ्या कंपन्यांच्या नावाखाली प्रवेश घेतले जातात; पण प्रत्यक्षात निम्न दर्जाच्या प्लेसमेंट दिल्या जातात.”
हे विद्यार्थ्यांची थेट फसवणूक असल्याचे संघटनेचे मत आहे.
विद्यार्थ्यांच्या हिताचे मुद्दे दुर्लक्षित – ABVP
“विद्यार्थी हे कॉलेजसाठी उत्पन्नाचे साधन नाहीत. ते शिक्षणाच्या केंद्रस्थानी आहेत,” असे नमूद करत ABVP ने प्राचार्यांना तात्काळ पुढील उपाययोजना करण्याची मागणी केली आहे:
• अवाजवी उशीरा फी दंड रद्द करावा
• फी हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा सुरू करावी
• प्लेसमेंटची पारदर्शक आणि वास्तविक माहिती द्यावी
संघटनेने इशारा दिला आहे की,
या मागण्यांवर त्वरित निर्णय न झाल्यास ABVP तीव्र आंदोलन छेडेल.

