महाड – महाड नगरपरिषदेच्या डेव्हलपमेंट प्लॅनअंतर्गत मंजूर झालेल्या अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत अडकली आहेत. काही रस्त्यांचा निकृष्ट दर्जाही उघड झाला आहे, ज्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे हे अर्धवट, अंधारात बुडलेले रस्ते आता रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांचे उघडे ‘अड्डे’ बनले आहेत. मद्यपींच्या रंगेल पार्ट्या, दारूच्या बाटल्या, सिगारेटचे थुटके आणि गुटख्याच्या पाकिटांनी रस्ता अक्षरशः कचऱ्याचे डेपो बनला आहे. तरीही महाड नगर परिषद आणि पोलीस प्रशासन मात्र गप्प असल्याचे नागरिकांचे आरोप आहेत.
गेल्या साडेचार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत महाड शहरात नवीन रस्त्यांना मंजुरी मिळाली. त्यापैकी अत्यंत महत्वाचा असलेला दस्तुरी नाका–नातेखिंड मार्गावरील डॉक्टर महामणकर हॉस्पिटल–सुभाष आर्केडदरम्यानचा सिमेंट काँक्रीट रस्ता काम सुरू होताच अचानक अर्ध्यावर थांबवण्यात आला. हा रस्ता आता शहरासाठी डोकेदुखी ठरत असून प्रत्यक्षात रात्रीच्या अंधारात तो तळीरामांचा स्थायी ठिकाण बनला आहे.
सुटलेल्या दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिक ग्लास, झिंगलेल्या व्यक्तींचा गोंधळ, आणि निर्भयपणे चालणाऱ्या ‘ओपन एअर’ पार्ट्यांमुळे या रस्त्याचे स्वरूप बदलून गेले आहे. नागरिकांच्या मते, महाड नगरपरिषद निवडणुकीच्या काळातही येथे “ओम फट स्वाहा”सारखे प्रकार झाले, तसेच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही राजकीय भानामतीचे प्रकारही करण्यात आले. तरीही प्रशासनाने या भागाकडे कधीच गांभीर्याने पाहिले नाही.
नागरिकांचे प्रश्न स्पष्ट आहेत –“नगर परिषदेचा हा अर्धवट रस्ता का पूर्ण होत नाही? रात्री उघडपणे चालणाऱ्या दारूपार्ट्यांवर पोलीस कारवाई का करत नाहीत? शहराची अब्रू मलिन करणारा हा प्रकार रोखायचा नेमका कोणाचा अधिकार आहे?”
नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन दोघांचेही दुर्लक्ष उघड झाले असून, यावर कोण कारवाई करणार आणि कधी करणार याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

