नागपूर –: मुंबई उपनगरातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शुक्ला कंपाऊंड येथे 1967 पासून अस्तित्वात असलेल्या निवासी व व्यावसायिक बांधकामांवर विकासक–मनपा अधिकारी संगनमताने, बाऊन्सर्सच्या मदतीने अमानुष पद्धतीने घातलेला घाला हा मुद्दा आज विधानसभेच्या विशेष बैठकीत प्रचंड गाजला.
शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी ही लक्षवेधी उपस्थित करताच सत्तारूढ सदस्यांनीही संताप व्यक्त केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सुर्वे म्हणाले, “बाऊन्सर्सनी रहिवाशांना घरातून सामानसुद्धा काढू दिले नाही. हिंदू मंदिराला कुलूप ठोकण्यात आले. सर्व मराठी घरे आहेत… एवढी निर्दयता का?”
या मुद्द्याला मनीषा चौधरी आणि ज्येष्ठ विरोधी सदस्य भास्कर जाधव यांनीही जोरदार समर्थन दिले. त्यांनी विकासक–अधिकारी संगनमताचा मुद्दा उपस्थित करत ही कारवाई थांबवून रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली.
उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले की, “संपूर्ण प्रकरणाचे पुरावे तपासले जातील. बाऊन्सर्स कोणाच्या आदेशावर आणले? कोणाकडून नियुक्त केले? याची चौकशी केली जाईल. अतिरिक्त मुख्य सचिवांकडून ६० दिवसांच्या आत चौकशी अहवाल मागवला जाईल.”

