नागपूर – राज्यातील नाफेड व सीबीआयची हमीभाव खरेदी केंद्रे, तसेच शेतमाल आणि कापसाला योग्य हमीभाव मिळण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पणनमंत्री जयकुमार रावळ यांचे उत्तर समाधानकारक नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत जोरदार गदारोळ केला. उपप्रश्न विचारण्याची संधी न मिळाल्याने विरोधक संतप्त झाले आणि धिक्कार घोषणा देत सभात्याग केला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा मुद्दा गंभीर असल्याचे सांगत “दुपारी ३ वाजता माझ्या दालनात बैठक घेऊ,” असे जाहीर केले. या प्रश्नावर सदस्यांची भावना अत्यंत तीव्र होती.
मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे: विजय वडेट्टीवार म्हणाले, “आयात शुल्क कमी का केले? सीसीआयची मर्यादा वाढवून काय साध्य होणार?”
बबनराव लोणीकर म्हणाले, “चार-चार लाखांची मागणी शेतकऱ्यांकडे अधिकारी करतात. पन्नास गावाला एक हमीभाव केंद्र हवे.”
प्रकाश सोळंके यांनी खरेदी केंद्रे ही “व्यापाऱ्यांच्या सोयीसाठीच चालतात,” असा आरोप केला.
नाना पटोले यांनी उत्तरावर आक्षेप घेत “प्रश्न राखून ठेवा,” अशी आग्रही मागणी केली. त्यांनी पोटतिडकीने सांगितले, “दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत.”
अनेक सदस्यांना उपप्रश्न विचारायचे होते, त्यामुळे ते अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणा देऊ लागले.

