गुरुग्राम : जपानी वाहन निर्माता निसान मोटर इंडिया कंपनीने भारतासाठी नव्या उत्पादन धोरणाची घोषणा करत २०२६ च्या सुरुवातीला आपली नवीन सात-सीटर बी-एमपीव्ही ‘ग्रॅव्हाइट’ बाजारात आणण्याचे जाहीर केले आहे. ही गाडी निसानच्या भारतासाठी नव्याने आखलेल्या आणि पुनरुज्जीवित उत्पादन श्रेणीतील पहिली गाडी ठरणार आहे.
भारतीय कुटुंबांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली ग्रॅव्हाइट ही किमतीबाबत जागरूक ग्राहकांसाठी अधिक सोयीस्कर, बहुपयोगी आणि लवचिक रचनेची गाडी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. दैनंदिन वापरासह लांब पल्ल्याच्या कौटुंबिक प्रवासासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार असल्याचे निसानचे म्हणणे आहे.
जुलै २०२४ मध्ये निसानच्या महत्त्वाकांक्षी उत्पादन योजनेतील दुसरे मॉडेल म्हणून ग्रॅव्हाइटची घोषणा करण्यात आली होती. कंपनीच्या रोडमॅपनुसार २०२६ च्या सुरुवातीला ग्रॅव्हाइट बाजारात दाखल होईल, त्यानंतर २०२६ च्या मध्यावर ‘टेक्टॉन’ ही प्रीमियम एसयूव्ही, तर २०२७ च्या सुरुवातीला सात-सीटर सी-एसयूव्ही सादर केली जाणार आहे. यामुळे भारतीय बाजारात निसानची उपस्थिती अधिक बळकट होणार आहे.
‘ग्रॅव्हाइट’ नावामागील अर्थ
‘ग्रॅव्हाइट’ हे नाव ‘ग्रॅव्हिटी’ या शब्दावरून प्रेरित असून त्यातून संतुलन, स्थैर्य आणि आकर्षण यांचे प्रतीक मांडले गेले आहे. भारतीय कुटुंबांना आरामदायी, सुरक्षित आणि कनेक्टेड अनुभव देणारी वाहने विकसित करण्याचा निसानचा दृष्टिकोन या नावातून व्यक्त होत असल्याचे कंपनीने सांगितले.
अंतर्गत रचना आणि डिझाइन
ग्रॅव्हाइटमध्ये प्रशस्त केबिन, लवचिक सीटिंग मांडणी आणि स्मार्ट स्टोरेज सुविधा देण्यात येणार आहेत. प्रवासी आणि सामानाच्या गरजेनुसार सीट्स सहज बदलता येतील, त्यामुळे शहरातील दैनंदिन प्रवासापासून ते कौटुंबिक सहलींपर्यंत ही गाडी उपयुक्त ठरणार आहे.
डिझाइनच्या बाबतीत ग्रॅव्हाइट निसानच्या जागतिक डिझाइन भाषेशी सुसंगत असून, कंपनीची ओळख ठरलेली सी-आकाराची फ्रंट ग्रिल या गाडीतही पाहायला मिळेल. मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण लूकसह हुडवरचे ब्रँडिंग आणि मागील बाजूवरील खास बॅजिंगमुळे ही गाडी आपल्या सेगमेंटमध्ये वेगळी ठरणार असल्याचा दावा निसानने केला आहे.
भारतातच उत्पादन, डीलर नेटवर्कचा विस्तार
ग्रॅव्हाइटचे उत्पादन रेनॉल्टच्या चेन्नई येथील प्रकल्पात स्थानिक पातळीवर केले जाणार आहे. यामुळे भारतीय ग्राहकांसाठी खास तयार केलेली वाहने देण्याच्या निसानच्या धोरणाला बळ मिळणार आहे. याचबरोबर टियर-१ आणि टियर-२ शहरांमध्ये डीलर नेटवर्कचा विस्तारही वेगाने सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
निसान एएमआयईओ विभागाचे अध्यक्ष मॅसिमिलियानो मेसिना यांनी सांगितले की, भारत हा निसानसाठी महत्त्वाचा बाजार आणि उत्पादन केंद्र असून आगामी मॉडेल्स भारताच्या गरजा लक्षात घेऊनच विकसित केली जात आहेत. निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांनीही ग्रॅव्हाइटला कंपनीच्या परिवर्तन प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.
दरम्यान, ‘मेड इन इंडिया’ निसान मॅग्नाइट ही गाडी सध्या ६५ देशांमध्ये निर्यात होत असून, भारत निसानसाठी उत्पादन आणि निर्यातीचे केंद्र बनत असल्याचेही कंपनीने नमूद केले.
ग्रॅव्हाइटची वैशिष्ट्ये आणि किंमत पुढील टप्प्यात जाहीर केली जाणार असल्याचे निसानकडून सांगण्यात आले आहे.

