मुंबई : घाटकोपर पूर्व येथील वल्लभबाग लेन आणि टिळक रोड परिसरात वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे तसेच सातत्याने होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले होते. या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंब केला.
घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांच्या नेतृत्वाखाली वल्लभबाग लेन आणि टिळक रोड परिसरात अनधिकृत फेरीवाले व वाहतूक कोंडीविरोधात भव्य जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारत तात्काळ व परिणामकारक कारवाईची मागणी केली.
अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या दोन्ही रस्त्यांवर रस्त्यांची रुंदी कमी झाली असून त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. यामुळे वाहनचालक, पादचारी, स्थानिक रहिवासी, विद्यार्थी तसेच व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी हे जनआंदोलन उभारण्यात आले.
या आंदोलनात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच घाटकोपर पूर्व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याचा दबाव निर्माण करण्यात आला असून, लवकरच या परिसरातील अनधिकृत फेरीवाले हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

