मुंबई – बांगलादेशात हिंदूंविरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराचा तसेच मैमनसिंह येथे कथित ईशनिंदेच्या आरोपावरून एका हिंदू युवकाची अमानुष हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे मुंबई व दिल्लीत बांगलादेश उच्चायोग कार्यालयासमोर उग्र निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा विहिपचे केंद्रीय अध्यक्ष ॲड. आलोककुमार यांनी केली.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे विहिप कोकण प्रांताच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ॲड. आलोककुमार यांनी स्पष्ट केले की, बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंविरोधात होत असलेल्या भेदभाव, अत्याचार आणि हिंसाचाराच्या निषेधार्थ देशभरातील प्रत्येक प्रांत व जिल्ह्यात विहिपतर्फे आंदोलन करण्यात येईल.
ते म्हणाले की, दीपु चंद्रदास या युवकाची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याचे कपडे फाडण्यात आले, त्याला फरफटत नेण्यात आले आणि जाळण्यात आले. “ईश्वर एक आहे” हे मत इस्लामविरोधी ठरवत त्याला लक्ष्य करण्यात आले. बांगलादेशात कायद्याच्या राज्याचा पूर्णपणे ऱ्हास झाला असून तेथील सरकार आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत आहे, असा आरोप त्यांनी केला.
आलोककुमार यांनी सांगितले की, भारताच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान देणारे प्रकार बांगलादेशात खुलेआम घडत आहेत. सोशल मीडियावर ‘ग्रेटर बांगलादेश’चा नकाशा प्रसिद्ध करून भारतातील पश्चिम बंगालसह सात राज्ये दाखवण्यात आली. अशा व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात बांगलादेश सरकारचे सल्लागार मुहम्मद युनुस यांनी राजकीय इतमामात सहभाग घेतला आणि त्याच्या विचारांनुसार बांगलादेश पुढे चालेल, अशी जाहीर विधाने केली. हे भारताच्या सार्वभौमत्वावर गंभीर आघात करणारे आहे, असे त्यांनी नमूद केले.
मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन होत असताना भारत सरकारने मूकदर्शक राहू नये, अशी मागणी त्यांनी केली. बांगलादेशातील सध्याच्या सरकारवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्यात यावा तसेच मुहम्मद युनुस यांचा नोबेल पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
बांगलादेशातील घटनांवर स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणविणारे काही बुद्धिजीवी गप्प का आहेत, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सांगितले की, भारतात एखाद्या दहशतवाद्याविरोधात कारवाई झाली तरी हेच लोक आवाज उठवतात. काश्मीरमधून हिंदूंचे स्थलांतर झाले तेव्हाही हे लोक मौन बाळगून होते, अशी टीकाही त्यांनी केली.
भारत हे हिंदू राष्ट्र असून येथे सर्व धर्मियांना समान वागणूक मिळावी, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या संदर्भात भारत सरकार योग्य तो निर्णय घेईल, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

