महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘स्वातंत्र्यानंतरही आम्ही भटकेच का?’ – उचल्याकार लक्ष्मण गायकवाडांचा साहित्य संमेलनातून आक्रोश

सातारा : छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांनी विमुक्त-भटक्या समाजाच्या वेदनांना शब्द देत सभागृह अक्षरशः स्तब्ध केले.

“बेरड, रामोशी, कैकाडी, मसणजोगी, नंदीबैलवाले यांसह अनेक जाती छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे होतो. रुप पालटून हेरगिरी करणारे खरे ‘सीआयडी’ आम्हीच होतो. मग आज स्वातंत्र्यातही आम्ही भटके का? असा काय गुन्हा केला आम्ही? स्वातंत्र्य मिळूनही अर्थसंकल्पात आमच्यासाठी एक रुपयाचीही तरतूद का नाही?” असा अंतःकरण हेलावून टाकणारा सवाल त्यांनी सत्काराला उत्तर देताना उपस्थित केला.

लेखक-प्रकाशक सत्कार सोहळा

साहित्य संमेलनाच्या लेखक-प्रकाशक सत्कार सोहळ्यात लक्ष्मण गायकवाड आणि सोलापूरचे ज्येष्ठ प्रकाशक बाबूराव मैंदर्गिकर यांचा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

‘आम्ही १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालो नाही’

गायकवाड म्हणाले की, “१८७१ मध्ये इंग्रजांनी कायदा करून आम्हाला जन्मजात गुन्हेगार ठरवले. आम्ही १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालो नाही. पाच वर्षे आणि सोळा दिवसांनी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या घोषणेनंतर आम्ही ‘विमुक्त’ झालो. पण आजही स्वतंत्र महाराष्ट्रात आमच्यासाठी अर्थसंकल्पात काहीच नाही.”

आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मंत्रीपदावर असताना, आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले असताना, साताऱ्यातील या व्यासपीठावर मावळ्यांचा सन्मान होतो आहे, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. “हे स्वातंत्र्यानंतरचे स्वातंत्र्य आहे,” असे म्हणत त्यांनी विमुक्त-भटक्या समाजासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्याचा पाठपुरावा होईल, आणि चार वर्षांपूर्वी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेले आश्वासन पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

‘हल्ले ब्राह्मणांनी नव्हे, तर मधल्या जातींनी केले’

गायकवाड यांनी समाजातील वास्तवाकडे लक्ष वेधताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आमच्यावर झालेले हल्ले ब्राह्मणांनी नव्हे, तर मधल्या आणि प्रस्थापित जातींनी केले. आता ब्राह्मण आणि विमुक्त जातींनी एकत्र येणे आवश्यक आहे.”

मंत्री मकरंद पाटील यांचे समर्थन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मंत्री मकरंद पाटील म्हणाले, “गायकवाड यांनी मांडलेली वेदना खरी आहे. ‘विमुक्त-भटक्या’ हे शब्दच हटवावेत आणि अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद असावी, यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करतील. आमचेही समर्थन राहील.”

श्रीनिवास ठाणेदार यांचा मराठी अभिमान

अमेरिकेतील खासदार श्रीनिवास ठाणेदार यांनीही यावेळी भाषण करताना, “‘मी मराठी आहे’ याचा मला अभिमान आहे. तो मराठी बाणा मी अमेरिकेत लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी दाखवून दिला आहे,” असे सांगितले.

शब्दकर्माचा सन्मान

संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी गायकवाड आणि मैंदर्गिकर यांचा सत्कार हा शब्दकर्माच्या कर्तृत्वाचा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली. स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेही भाषण झाले.
कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा सर्व वक्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात