छबिलदास शाळा, दादर येथे जनरल एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
मुंबई : १३५ वर्षांची समृद्ध शिक्षण परंपरा जपणाऱ्या जनरल एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन दादर येथील छबिलदास शाळेत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित ‘अक्षीकर पुरस्कार’ वितरण सोहळ्यात संस्थेच्या विचारधारेचा वारसा पुढे नेणाऱ्या आदर्श शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
कै. गोपाळ नारायण अक्षीकर यांनी २४ एप्रिल १८९२ रोजी स्थापन केलेल्या या संस्थेच्या आज मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात मराठी, इंग्रजी व सीबीएसई पॅटर्नच्या एकूण ४९ शाळा-महाविद्यालयांचा विस्तार झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील ही परंपरा आजही मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या ध्येयाने कार्यरत असल्याचे या सोहळ्यात अधोरेखित झाले.
छबिलदास मुला-मुलींच्या शाळेतील अक्षीकर-ताम्हाणे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष देवराज लालचंद राका यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी आणि सनदी लेखापाल व आयसीएआयचे माजी अध्यक्ष मुकुंद चितळे उपस्थित होते. कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, कोषाध्यक्ष रवींद्र ताम्रस, उपकार्याध्यक्ष प्रदीप राका, उपकार्यवाह महेश केळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संस्थापक अक्षीकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करत वृक्ष आणि भारतीय संविधानाच्या प्रतीचे पूजन करून कार्यक्रमाला मूल्याधिष्ठित स्वरूप देण्यात आले.
आपल्या मनोगतात कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी संस्थेच्या १३५ वर्षांच्या परंपरेचा उल्लेख करत, “गुरु-शिष्य परंपरेतील मूल्यशिक्षणाची पुनर्स्थापना ही काळाची गरज आहे,” असे मत व्यक्त केले.
प्रमुख अतिथी संजय घाडी यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत, “शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आदरयुक्त प्रेम आणि शिस्त रुजवतात. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देणारी ही संस्था प्रेरणादायी आहे,” असे सांगितले.
विशेष अतिथी मुकुंद चितळे यांनी शिक्षकांनी आयुष्यभर विद्यार्थी राहण्याचा संदेश देत, “विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांना ओळखून त्यांना फुलवणे हेच खऱ्या शिक्षकाचे कार्य आहे,” असे प्रतिपादन केले.
यावेळी विविध गटांतील ‘अक्षीकर पुरस्कार’ विजेत्यांचा सन्मान रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन करण्यात आला.
प्रमुख पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे —
प्रशिक्षित पदवीधर गट : सौ. रंजना भरत पाटील
प्रशिक्षित अ-पदवीधर गट : सौ. कृपा नितीन घाग
प्राथमिक विभाग : सौ. योगिता विलास कदम
आदर्श शिक्षकेतर कर्मचारी : श्री. प्रदीप काशिनाथ म्हात्रे
आदर्श मुख्याध्यापक : श्री. सतीश सोपान घोलप
आदर्श मुख्याध्यापिका : सौ. ज्योती ज्ञानेश्वर पाटील
आदर्श शिक्षिका : सौ. सुनीता शैलेंद्र गुप्ता
पुरस्कार विजेत्यांच्या वतीने सौ. ज्योती पाटील यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले तसेच संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेणारा माहितीपट सादर करण्यात आला. सूत्रसंचालन अर्जिता कुलकर्णी, सुनील फर्डे, कल्याणी शितुत, सदाशिव कारळे, सई पटवर्धन आणि राहुल काकडे यांनी केले, तर स्वागतगीत सुनेत्रा मिस्त्री यांनी सादर केले.
समारंभाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संस्थेच्या गौरवशाली परंपरेला सलाम करत शिक्षण क्षेत्रातील योगदानाची नवी दिशा निश्चित करण्याचा संकल्प व्यक्त केला.

