मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये तृतीय वर्ष बी.कॉम. (TYBCom) अंतिम सत्राच्या प्रश्नपत्रिका फूटीचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) मुंबईतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास हादरला असून, हा केवळ निष्काळजीपणाचा प्रकार नसून संघटित भ्रष्टाचार आणि संगनमताचे लक्षण असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या परीक्षांपूर्वी किमान तीन प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करण्यात येत असून, विद्यापीठ प्रशासनाची कार्यक्षमता आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अभाविपच्या मते, इतक्या मोठ्या घोटाळ्यानंतरही विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संशय अधिक गडद झाला आहे. उलट, प्रकरण दडपण्याचा आणि दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. घटना घडून तेरा दिवस उलटूनही अधिकृत स्पष्टीकरण किंवा पारदर्शक माहिती समोर न आल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर अभाविप मुंबईच्या शिष्टमंडळाने राज्यपाल व कुलपती यांची भेट घेऊन पुढील मागण्या मांडल्या:
- संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र आणि निष्पक्ष SIT मार्फत चौकशी करावी
- संबंधित अधिकारी व दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत
- फुटलेल्या प्रश्नपत्रिकांच्या परीक्षा रद्द करून नव्या तारखा जाहीर कराव्यात
- चौकशीचा सविस्तर व पारदर्शक अहवाल सार्वजनिक करावा
- कोणत्याही निरपराध विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची लिखित हमी द्यावी
अभाविप मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी यांनी इशारा देत सांगितले की, “५०,००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या गंभीर प्रकरणात तात्काळ आणि कठोर कारवाई झाली नाही, तर अभाविप रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. दोषींना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही.”

