मुंबई: प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, लेखक आणि सामाजिक भान जपणारे विचारवंत Anand Nadkarni यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, वैचारिक आणि मानसिक आरोग्य क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. समाजवादी नेते Kapil Patil यांनी डॉ. नाडकर्णी यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
“दुःख, चिंता आणि वैफल्याने ग्रासलेल्या हजारो कुटुंबांना नव्या आनंदाचा आधार देणारा माणूस हरपला,” अशा शब्दांत कपिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले की, डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केवळ मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम केले नाही, तर त्यांनी मानसोपचारशास्त्राला एका नव्या सामाजिक आणि मानवीय दृष्टीने लोकांपर्यंत पोहोचवले.
डॉ. नाडकर्णी यांनी अनेक तरुणांना मानसिक आधार देत त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. “जगण्याची उमेद, नव्याने उभं राहण्याची ताकद आणि यशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा त्यांनी असंख्य युवकांना दिली,” असे पाटील यांनी नमूद केले.
त्यांच्या वडिलांकडून मिळालेली पुरोगामी, वैज्ञानिक आणि सर्जनशील विचारांची परंपरा त्यांनी आयुष्यभर जपली. केईएमच्या जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना डॉ. महेश गोसावी आणि डॉ. रवि बापट यांच्यासोबत त्यांची जुळलेली मैत्री आणि सामाजिक भान याच काळात अधिक दृढ झाले.
तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मुलीच्या गुणवाढ प्रकरणात सत्य बाहेर आणण्यासाठी डॉ. महेश गोसावी यांनी उभा केलेल्या लढ्यात डॉ. आनंद नाडकर्णी यांनीही सक्रिय साथ दिली होती. त्या आंदोलनामुळे तत्कालीन मुख्यमंत्री आणि राज्यपालांनाही पद सोडावे लागले होते.
साहित्य, कला आणि संस्कृती क्षेत्रातही डॉ. नाडकर्णी यांनी स्वतंत्र ठसा उमटवला. कविता, कथा, एकांकिका, ललित लेखन आणि सामाजिक अभिव्यक्तीच्या विविध माध्यमांतून त्यांनी मानवी मनाचा शोध घेतला. त्यांच्या Institute for Psychological Health आणि ‘वेध’ उपक्रमातून हजारो युवकांना मानसिक बळ आणि जीवनदृष्टी मिळाली.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. २०१० मध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर आयोजित कार्यक्रमात तत्कालीन गृहमंत्री R. R. Patil उपस्थित राहिले होते. त्यातूनच महाराष्ट्रात ‘चाइल्ड हेल्पलाईन’सारख्या उपक्रमांना दिशा मिळाली, अशी आठवण कपिल पाटील यांनी सांगितली.
कोविड काळात मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘साने गुरुजी बालभवन’ या उपक्रमाच्या संकल्पनेतही डॉ. नाडकर्णी यांचा महत्त्वाचा सहभाग होता. “आनंद स्वतः अनेक शारीरिक व्याधींनी त्रस्त होता, पण त्याने ते कधी चेहऱ्यावर दाखवले नाही,” असे सांगत कपिल पाटील यांनी आपल्या ४०-४५ वर्षांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.
“आनंद, तुझी आठवण येत राहील,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या श्रद्धांजलीचा शेवट केला.

