महाराष्ट्र ताज्या बातम्या

तुपकरांच्या नेतृत्वात कर्जमुक्तीचा लढा अधिक तीव्र; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा राज्यव्यापी विस्ताराचा निर्धार  

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पुणे येथील राज्यस्तरीय बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी चैत्राली शेलार; प्रकृती अस्वास्थ्यामुळे रविकांत तुपकर बैठकीस अनुपस्थित  

सरकारच्या अटी-शर्तींच्या कर्जमाफीला फसवी ठरवत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने पुण्यातील बैठकीत सरसकट कर्जमुक्तीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. राज्यभर संघटन विस्तारासह विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.  

सरकारने अटी-शर्तींचा गुंता निर्माण करून केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून, राज्यात सरसकट कर्जमुक्ती लागू होईपर्यंत संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा एकमुखी निर्धार क्रांतिकारी शेतकरी संघटनेने व्यक्त केला आहे. पुण्यातील कोथरूड येथे झालेल्या राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत राज्यभर संघटनात्मक विस्ताराला गती देण्याचाही निर्णय घेण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रविकांत तुपकर बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.

बैठकीत राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळेपर्यंत आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे म्हणाले, “रविकांत तुपकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला कर्जमुक्तीचा लढा आता कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. राज्यभरातील शेतकरी संघटनेकडे आशेने पाहत असून, तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा अधिक व्यापक स्वरूपात उभारला जाईल.”

पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कसबे यांनी सांगितले की, बुलडाणा जिल्ह्यातून सुरू झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा विस्तार आता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत झाला आहे. आगामी काळात राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात संघटनात्मक विस्तारासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

बैठकीत संघटनेच्या विविध पदांवरील नव्या नियुक्त्यांचीही घोषणा करण्यात आली. चैत्राली शेलार (संगमेश्वर, रत्नागिरी) यांची महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी, तर पूजा चव्हाण (हिमायतनगर, नांदेड) यांची मराठवाडा विभागीय महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी चैत्राली शेलार यांची नियुक्ती करण्यात आली.

याशिवाय, राजेंद्र ढमाले यांची पुणे शहर जिल्हाध्यक्ष, ॲड. अनिल भिलारे यांची पुणे विधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष, अमोल बोराडे यांची पुणे शहर जिल्हा उपाध्यक्ष, ज्योतिराम पावले यांची भूम तालुका संघटक आणि विशाल लोमटे यांची सातारा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली. नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे रविकांत तुपकर यांनी अभिनंदन केले.

बैठकीला राज्य समन्वयक सचिन पांडुळे, राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे, राज्य उपाध्यक्ष जयवंत दहिभाते, बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, राज्य कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब मुंढे, धाराशिव जिल्हाध्यक्ष भास्कर वारे, सांगली जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांच्यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात