महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘लोकराज्य’ मासिकातील छायाचित्राच्या मुद्रणदोषावर विधानसभेत गदारोळ; मुख्यमंत्र्यांची दिलगिरी, २४ तासांत कारवाईचे आश्वासन  

'लोकराज्य' मासिकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राच्या मुद्रणदोषाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत सरकारकडून स्पष्टीकरण आणि कारवाईची मागणी करताना काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत.

मुंबई : राज्य सरकारच्या अधिकृत ‘लोकराज्य’ मासिकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र आणि भारतरत्न चिन्ह उलटे छापल्याच्या मुद्रणदोषावर गुरुवारी विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करत संबंधित दोषींवर २४ तासांच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत प्रकाशनात अशी चूक कशी घडली, असा सवाल केला. त्यानंतर विरोधी सदस्यांनी सरकारच्या निष्काळजीपणावर टीका करत या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.

वाढत्या गदारोळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करत, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या प्रतिमेबाबत कोणतीही चूक सरकारला मान्य नाही,” असे स्पष्ट केले. या मुद्रणदोषाबद्दल त्यांनी सभागृहाची आणि जनतेची दिलगिरी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित जबाबदार व्यक्तींवर २४ तासांच्या आत योग्य कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

या घटनेनंतर अधिकृत सरकारी प्रकाशनातील संपादकीय आणि पडताळणी प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, सरकारच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात