मुंबई : राज्य सरकारच्या अधिकृत ‘लोकराज्य’ मासिकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र आणि भारतरत्न चिन्ह उलटे छापल्याच्या मुद्रणदोषावर गुरुवारी विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करत संबंधित दोषींवर २४ तासांच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत प्रकाशनात अशी चूक कशी घडली, असा सवाल केला. त्यानंतर विरोधी सदस्यांनी सरकारच्या निष्काळजीपणावर टीका करत या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.
वाढत्या गदारोळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करत, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या प्रतिमेबाबत कोणतीही चूक सरकारला मान्य नाही,” असे स्पष्ट केले. या मुद्रणदोषाबद्दल त्यांनी सभागृहाची आणि जनतेची दिलगिरी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित जबाबदार व्यक्तींवर २४ तासांच्या आत योग्य कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
या घटनेनंतर अधिकृत सरकारी प्रकाशनातील संपादकीय आणि पडताळणी प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, सरकारच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

