मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत श्रीराम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक २०२६ वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या विश्वस्त मंडळात चांगली आणि प्रामाणिक माणसे घ्यावीत, राम मंदिराची दानपेटी लुटणाऱ्यांना घेऊ नये, राजकीय व्यक्तींना विश्वस्त नेमू नये, अशा मागण्या करत विरोधकांनी शासनाला धारेवर धरले.
विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी बाकांवरून शेरेबाजी झाल्याने सभागृहात तू-तू-मैं-मैं आणि टोलेबाजी सुरू झाली. विरोधी बाकांवरून “जय श्रीराम”च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच अयोध्येतील कथित दानपेटी गैरव्यवहाराचा उल्लेख करत “चंदाचोर”च्या घोषणाही देण्यात आल्या.
काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी हे विधेयक घाईघाईने मंजूर न करता संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावे, अशी मागणी केली.
राज्यमंत्री आणि रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. मात्र, विधेयकाच्या प्रती सदस्यांना वेळेवर मिळाल्या नाहीत, मग त्याचा अभ्यास कधी करायचा, असा आक्षेप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी घेतला.
विधेयकाच्या प्रती सदस्यांना वितरित झाल्यानंतर बोलताना भास्कर जाधव यांनी प्रामाणिक आणि विश्वासू व्यक्तींनाच विश्वस्तपदी नेमावे, अशी मागणी केली. अयोध्या राम मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराचा उल्लेख करत ते म्हणाले की, काहींनी रामाला लुटण्यासही मागेपुढे पाहिले नाही. १९९० च्या राममंदिर आंदोलनात आपण लाठ्या खाल्ल्याचा उल्लेख करत, “आमची रामभक्ती कृतीतून आहे, तुमची बोलण्यातून आहे,” असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी विधेयक घाईघाईने का आणले जात आहे, असा सवाल केला. विश्वस्तांना भत्ता देण्याची तरतूद कशासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देवस्थानच्या नावाखाली ऊर्जा प्रकल्प, कोल वॉशरी किंवा काही विशिष्ट घटकांना लाभ होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
वडेट्टीवार यांनी अयोध्येतील कथित गैरव्यवहाराचा उल्लेख करत, “रामटेकमध्ये तसे होऊ नये. जर येथे भ्रष्टाचार झाला नसेल तर विश्वस्त बदलण्याची घाई का?” असा सवाल केला. हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावे, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.
जयंत पाटील यांनी आमदार आणि नगराध्यक्षांना या ट्रस्टवर का घेतले जाते, असा प्रश्न उपस्थित केला. विश्वस्त होण्यासाठी रामभक्त असल्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यक करणे हे सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वाशी सुसंगत नाही, असा आक्षेप त्यांनी घेतला. त्यामुळे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावे, अशी मागणी त्यांनी केली.
भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनीही विधेयकातील एका तरतुदीकडे लक्ष वेधले. दोष सिद्ध झाल्याशिवाय कारवाई नाही, ही तरतूद चुकीची असून गुन्हा दाखल होताच कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
जितेंद्र आव्हाड आणि वरुण सरदेसाई यांनीही या विधेयकावर आपली मते मांडली.
उत्तर देताना राज्यमंत्री आशीष जयस्वाल म्हणाले की, ५५ वर्षांनंतर रामटेक देवस्थानसाठी ट्रस्टची रचना केली जात आहे. या ट्रस्टवर राज्य सरकारची संपूर्ण देखरेख राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर सभागृहाने श्रीराम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक २०२६ मंजूर केले.

