मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांचे नगरपालिकेला निवेदन
महाड : महाड शहरातील सर्व दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांच्या नावाच्या पाट्या मराठी भाषेत लावण्याची सक्ती करावी, अन्यथा १५ दिवसांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी दिला आहे.
यासंदर्भात महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील दुकाने व आस्थापनांच्या नावाच्या पाट्यांवर मराठी भाषा ठळकपणे असणे आवश्यक आहे. शासनाने याबाबत कारवाईची प्रक्रिया सुरू केली असतानाही महाड शहरातील काही दुकाने आणि आस्थापनांनी अद्याप मराठीतील नामफलक लावलेले नाहीत.
महाड शहर व परिसरातील सर्व संबंधित दुकानदारांनी पुढील १५ दिवसांत मराठीतील पाट्या लावाव्यात. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश शिंदे, तालुका सचिव अमोल दळवी, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अथर्व देशमुख, महाड शहराध्यक्ष शंतनू पिसाट, रायगड जिल्हा आस्थापना संघटक शेखर सावंत, प्रदीप पिसाट यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

