महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड एमआयडीसीतील अनुदानित निंबोळी-लेपित युरियाच्या कथित गैरवापरप्रकरणी दोषींवर कारवाईची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)ची मागणी

महाड एमआयडीसीतील कथित अनुदानित निंबोळी-लेपित युरियाच्या गैरवापरप्रकरणी पोलीस ठाण्यात निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी.

१५ दिवसांत कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

महाड : महाड एमआयडीसी परिसरातील सिद्धार्थ कलर केम प्रा. लि. आणि कोपरान रिसर्च लॅबोरेटरीज येथे शासकीय अनुदानित निंबोळी-लेपित युरियाचा कथित बेकायदेशीर साठा आणि वापर झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी केली आहे.

या मागणीसाठी पक्षाच्या वतीने महाड एमआयडीसी पोलीस ठाणे, महाड तहसीलदार कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) यांच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष श्रीकांत कांबळे यांनी सांगितले की, शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित दरात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या खताचा औद्योगिक वापर होत असल्यास तो शेतकऱ्यांच्या हक्कांवर आघात असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी व्हावी.

तपासात दोषी आढळणारे मालक, संचालक, अधिकृत स्वाक्षरीदार, वरिष्ठ अधिकारी तसेच या कथित गैरप्रकारात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

श्रीहर्ष कांबळे यांनी इशारा दिला की, पुढील १५ दिवसांत या प्रकरणात योग्य ती कारवाई झाली नाही, तर रायगड जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली हा विषय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. आवश्यक असल्यास राज्यभर जनआंदोलन उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पक्षाने या प्रकरणात संपूर्ण पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार, संबंधित कारखानदार, वितरक आणि अन्य संबंधित घटकांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.

यावेळी पराग वडके, रुपेश सकपाळ, निकेत तांबट, नितेश पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात