महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या CDOE निकालातील विलंबावरून अमोल मातेले यांचा आरोप; ७ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते ॲड. अमोल मातेले आणि शिष्टमंडळ मुंबई विद्यापीठाच्या CDOE संचालकांसोबत विद्यार्थ्यांच्या प्रलंबित निकाल आणि पुनर्मूल्यांकनाच्या मागण्यांवर चर्चा करताना.

निकालातील विलंब, कथित सामूहिक नापासी आणि पुनर्मूल्यांकनाची मागणी; महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या कलम ८९चा उल्लेख

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्र (CDOE/IDOL) मधील निकाल प्रक्रियेत होत असलेल्या कथित विलंबाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी शुक्रवारी विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप करत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. पुढील सात दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

मातेले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने CDOE संचालकांची भेट घेऊन निवेदन दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ८९ नुसार परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे अपेक्षित असताना काही निकाल चार महिन्यांपर्यंत प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैधानिक हक्कांवर परिणाम करणारा प्रकार असल्याचा दावा मातेले यांनी केला.

तसेच एमएमएस अभ्यासक्रमातील ६० विद्यार्थ्यांपैकी ५२ विद्यार्थ्यांना नापास करण्यात आल्याचा उल्लेख करत, अंतर्गत मूल्यमापनात चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत शून्य गुण देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. उत्तरपत्रिकांचे योग्य मूल्यमापन झाले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची मोफत पुनर्तपासणी करण्यात यावी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती विनामूल्य उपलब्ध करून द्याव्यात तसेच कथित अनियमिततेस जबाबदार असलेल्या तपासणीदारांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) आणि क्रेडिट प्रणालीच्या अंमलबजावणीत पुरेशी माहिती न दिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत प्रशासनाने याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करावे, अशी मागणीही मातेले यांनी केली.

प्रशासनाने पुढील सात दिवसांत प्रलंबित निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

(टीप : ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकावर आधारित असून, मुंबई विद्यापीठाची अधिकृत प्रतिक्रिया मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात