MMR Region आणि महाराष्ट्रातील महानगरांमध्ये प्रथम क्रमांक; नियोजनबद्ध अंमलबजावणीचा आदर्श
अत्यंत आव्हानात्मक शहरी परिस्थितीत यशस्वी मतदार पडताळणी; लोकशाही बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
मुंबई: भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेत १८४ भायखळा विधानसभा मतदारसंघाने MMR Region तसेच महाराष्ट्रातील महानगर क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांकाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवत निवडणूक व्यवस्थापनात आदर्श निर्माण केला आहे.
मुंबईसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या शहरी भागात झोपडपट्ट्या, उंच निवासी इमारती, पुनर्विकास प्रकल्प, सततचे स्थलांतर, भाडेकरूंची बदलती संख्या, नागरिकांची अनुपस्थिती, दुबार व मृत मतदारांची पडताळणी तसेच प्रत्येक नोंदीची प्रत्यक्ष खातरजमा अशा अनेक आव्हानांवर यशस्वी मात करत ही मोहीम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात आली.
या मोहिमेची अंमलबजावणी मतदार नोंदणी अधिकारी तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई शहर कृष्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सूक्ष्म नियोजन, प्रभावी समन्वय, नियमित आढावा आणि तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धती यांच्या साहाय्याने प्रत्येक BLO, सुपरवायझर आणि AERO यांना स्पष्ट कार्ययोजना देण्यात आली. क्षेत्रनिहाय उद्दिष्टे निश्चित करून दैनंदिन प्रगतीचा आढावा, प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय, सातत्यपूर्ण क्षेत्रभेटी आणि पारदर्शक अंमलबजावणी यामुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणा एकसंधपणे कार्यरत राहिली.
निवडणूक प्रशासनाच्या मते, या मोहिमेतील यश हे केवळ एका अधिकाऱ्याचे किंवा कार्यालयाचे नसून २६५ BLO, ५२ सुपरवायझर्स, २६ AERO, अधिकारी-कर्मचारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, राजकीय पक्षांचा सहभाग, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्था, प्रसारमाध्यमे आणि नागरिकांच्या सक्रिय सहकार्याचे सामूहिक फलित आहे.
मुख्य ठळक मुद्दे
MMR Region आणि महाराष्ट्रातील महानगरांमध्ये प्रथम क्रमांक
एकूण मतदार : २,५८,५६६
Mapped मतदार : १,९६,२४८ (७५.९०%)
Unmapped मतदार : ६२,३१८ (२४.१०%)
प्रगणन नमुने संकलित : २,५८,५६६
२६५ BLO, ५२ सुपरवायझर्स आणि २६ AERO यांचा सहभाग
राजकीय पक्षांसोबत ५ समन्वय बैठका
पारदर्शकता, अचूकता आणि सर्वसमावेशकतेवर विशेष भर
कृष्णा जाधव यांचे मनोगत
“ही कामगिरी संपूर्ण निवडणूक यंत्रणेच्या सामूहिक समर्पणाचे फलित आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, BLO, सुपरवायझर्स, AERO, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, गृहनिर्माण संस्था, राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांच्या सक्रिय सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला. आमचे ध्येय केवळ उद्दिष्ट पूर्ण करणे नव्हते, तर मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक बनविणे हे होते.”
— कृष्णा जाधव
मतदार नोंदणी अधिकारी, १८४ भायखळा विधानसभा मतदारसंघ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई शहर

