गणेशोत्सवापूर्वी कामगारांना बोनसचे वाटप; गतवर्षीच्या तुलनेत कमाल आणि किमान दोन्ही रकमांमध्ये वाढ
नवी मुंबई : दिघा येथील सुल्झर पंप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील कामगारांना यंदा अडीच लाख रुपयांहून अधिक बोनस देण्यात आला आहे. सुल्झर पंप्स इंडिया एम्प्लॉईज युनियनने दिलेल्या माहितीनुसार, २०२५ वर्षासाठी कमाल ₹२,६१,३८० तर किमान ₹२,४६,८६३ इतका बोनस ८ सप्टेंबर रोजी कामगारांना देण्यात आला. कंपनीत दिवाळीचा बोनस करारानुसार गणेशोत्सवापूर्वी देण्याची पद्धत आहे. ९ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या वेतनवाढ आणि बोनस करारानुसार यंदाचे बोनस वाटप करण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. गतवर्षी २०२४ वर्षासाठी कमाल ₹२,४३,३११ आणि किमान ₹२,२५,२३९ इतका बोनस देण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा कमाल बोनसची रक्कम ₹१८,०६९ ने, तर किमान बोनसची रक्कम ₹२१,६२४ ने वाढली आहे.
सुल्झर पंप्स इंडिया एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष रुपेश पवार, सरचिटणीस प्रमोद लोटणकर आणि खजिनदार माधव सकपाळ यांच्या उपस्थितीत बोनससंदर्भातील सभा झाली. कंपनीतील कामगार जयकांत कदम यांचे काही दिवसांपूर्वी घरी असताना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे सभेच्या सुरुवातीला उपस्थित कामगारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सहकाऱ्याच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर बोनस मिळाल्याचा कोणताही गाजावाजा न करता सभा साधेपणाने घेण्यात आली. बोनसच्या रकमेकडे केवळ सणासुदीचा अतिरिक्त पैसा म्हणून न पाहता तिचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन युनियनचे अध्यक्ष रुपेश पवार यांनी कामगारांना केले. बोनस कराराची अंमलबजावणी केल्याबद्दल कामगारांनी कंपनी व्यवस्थापन आणि युनियनच्या पदाधिकाऱ्यांबद्दल समाधान व्यक्त केले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुजल शहा तसेच मानव संसाधन विभागातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याचाही युनियनने उल्लेख केला.

