अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगरचा कचरा होणार शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया; KfW सहाय्यित प्रकल्पात MRF, जैविक कचरा प्रक्रिया आणि सॅनिटरी लँडफिल
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) बदलापूर येथील 600 टन प्रतिदिन क्षमतेच्या एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे 60 टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. KfW सहाय्यित Mumbai Metropolitan Region Urban Infrastructure Improvement Programme अंतर्गत उभारण्यात येणारा हा प्रकल्प अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांतील महानगरपालिका घनकचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. प्रकल्प Design-Build-Operate-Transfer (DBOT) तत्त्वावर उभारला जात असून, कचऱ्यातील पुनर्वापरयोग्य घटक वेगळे करणे, जैवविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करणे आणि उर्वरित कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे अशी एकात्मिक व्यवस्था येथे उभारण्यात येत आहे.
या सुविधेत Material Recovery Facility (MRF), जैवविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आणि उर्वरित कचऱ्यासाठी sanitary landfillचा समावेश आहे. कचऱ्यातील कागद, प्लास्टिक, धातू आणि काच यांसारखे पुनर्वापरयोग्य घटक वेगळे करून पुनर्चक्रणासाठी पाठवले जाणार आहेत. जैवविघटनशील कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करण्याची व्यवस्था असून, योग्य कोरड्या कचऱ्यापासून Refuse Derived Fuel (RDF) तयार करण्याचाही प्रस्ताव आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीनही शहरांमधील कचऱ्याच्या उघड्या विल्हेवाटीवरील आणि पारंपरिक landfillवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल. कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या leachate वर स्वतंत्र प्रक्रिया करून माती आणि भूजल प्रदूषणाचा धोका कमी करण्याचीही सुविधा प्रकल्पात प्रस्तावित आहे. जैविक कचऱ्याची शास्त्रोक्त प्रक्रिया झाल्याने मिथेन उत्सर्जन कमी करण्यासही मदत होईल, असा MMRDA चा दावा आहे.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी MMRDA, तीनही स्थानिक स्वराज्य संस्था, KfW Development Bank, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, कंत्राटदार, तंत्रज्ञान पुरवठादार आणि संबंधित वैधानिक यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात आहे. प्रकल्पस्थळी टप्प्याटप्प्याने विकासकामे, पूर्वीपासून साचलेल्या कचऱ्याचे निर्मूलन, नियंत्रित blasting, पूरक पायाभूत सुविधा तसेच यंत्रसामग्रीची खरेदी आणि उभारणीची कामे सुरू आहेत. MMRDA नुसार, कामाच्या प्रगतीशी जोडलेली milestone-based payment system, स्वतंत्र तांत्रिक पडताळणी आणि Project Management Consultant मार्फत देखरेख ठेवली जात आहे. KfW Development Bank सोबत पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय निकषांबाबतही समन्वय केला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगरमधील दररोज 600 टन महानगरपालिका घनकचऱ्यावर एकाच प्रादेशिक सुविधेत प्रक्रिया करण्याची क्षमता उपलब्ध होणार आहे.

