रात्रीच्या बंदीचे उल्लंघन करून भररस्त्यात रॉकेट उडवले; कारवाई केवळ तक्रारींपुरतीच मर्यादित असल्याची टीका
भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात रात्रीच्या वेळी फटाके फोडण्यावरील निर्बंध धाब्यावर बसवून सार्वजनिक रस्ते, रहिवासी परिसर आणि गर्दीच्या बाजारपेठांमध्ये धोकादायक पद्धतीने रॉकेट व अन्य फटाके उडवणाऱ्यांविरोधात अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. काशिगाव, नवघर आणि भाईंदर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध घटनांप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. मात्र, शहरभर सर्रास नियमभंग होत असताना पोलिसांनी केवळ काही मोजक्या प्रकरणांत गुन्हे दाखल केल्याने या कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिरारोड येथील जे. पी. बॅक रोड परिसरात ११ नोव्हेंबर रोजी पहाटे एकच्या सुमारास नियमांचे उल्लंघन करून फटाके फोडण्यात आले. याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी आदित्यराज अरविंद गुप्ता (वय ३७, रा. एलोरा, जे. पी. नॉर्थ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदर पूर्व परिसरातही सार्वजनिक शांततेचा भंग करून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या घटनांची नोंद झाली आहे. रात्री सुमारे अकराच्या सुमारास बाळासाहेब ठाकरे मैदानाजवळ धोकादायक पद्धतीने रॉकेट फोडल्याप्रकरणी बडेगुरू चंद्रबली यादव (वय ३७) याच्याविरोधात नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याच परिसरातील आनंद पार्क, इंद्रलोक फेज ६ येथे धोकादायक पद्धतीने रॉकेट आणि अन्य फटाके उडवल्याप्रकरणी तेजस तुळशीदास सौरप (वय २३, रा. साई पूजा, शिर्डी नगर) आणि आकाश दीपक बेरा (वय २३, रा. आनंद पार्क) या दोघांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भाईंदर पश्चिमेकडील गर्दीच्या मुख्य बाजारपेठेत आणि रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही अशाच घटना घडल्या. स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगजवळ, इंदिरा मार्केटमधील दुकान क्रमांक ३६ आणि ३९ समोर ज्वलनशील साहित्याच्या सान्निध्यात रॉकेट उडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी १० नोव्हेंबर रोजी अमरजीत रामचंद्र केवट (वय ३४) आणि अंकित राजेश यादव (वय २०, दोघेही रा. इंदिरा मार्केट) यांच्याविरोधात भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
त्याचप्रमाणे स्टेशन रोडवरील मुख्य रस्त्यावर धोकादायक पद्धतीने फटाके फोडल्याप्रकरणी १० नोव्हेंबर रोजी मोनू बळीराम रामदास (वय ३३, रा. व्यंकटेश अपार्टमेंट), आदित्य जितेंद्र कोळी (वय २६, रा. डॉनिक हाऊस, मांडली तलावाजवळ), लोचन कुमार दास (वय २८, रा. भाईंदर) आणि संतोष दर्शन गुप्ता (वय ४९, रा. साईबाबा नगर, शिवसेना गल्ली) या चौघांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बंदी असतानाही रस्त्यावर फटाके; प्रशासन नेमके करत होते काय?
शहरात रात्री दहानंतर फटाके फोडण्यावरील निर्बंध असतानाही अनेक ठिकाणी उशिरापर्यंत आतषबाजी सुरू होती. सार्वजनिक रस्ते, रहिवासी इमारतींचे परिसर, बाजारपेठा आणि वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी रॉकेट तसेच मोठा आवाज करणारे फटाके फोडण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
विशेषतः गर्दीच्या बाजारपेठेत आणि ज्वलनशील साहित्याजवळ रॉकेट उडवण्याचे प्रकार घडत असताना प्रतिबंधात्मक कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
न्यायालयीन निर्देश आणि शासनाच्या नियमांची सुरुवातीपासून काटेकोर अंमलबजावणी केली असती, तर अशा घटना रोखता आल्या असत्या, अशी टीका होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तक्रारी आल्यानंतर गुन्हे दाखल करणे पुरेसे आहे का, की अशा घटना घडूच नयेत यासाठी पोलीस आणि महापालिकेने सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण, आगीचा धोका तसेच सामान्य नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता नियमांची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दिसली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पोलीस, महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकारांकडे गांभीर्याने पाहिले असते, तर नागरिकांना प्रदूषणाचा त्रास आणि संभाव्य दुर्घटनांचा धोका सहन करावा लागला नसता, अशी टीका होत आहे. आता दाखल झालेल्या गुन्ह्यांपलीकडे जाऊन भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

