मुंबई

शिंदेंना हटवण्यासाठी ननावरे आत्महत्येचे विरोधकांच्या हाती कोलीत? मंत्री शंभुराज देसाईसह आमदार डॉ बालाजी किणीकर गोत्यात?

Twitter : @vivekbhavsar

मुंबई

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य आठ बाहुबली नेत्यांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात प्रवेश केल्यापासून, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची अस्थिर असल्याची चर्चा सुरु झालेली आहे. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचा निर्णयही अद्याप यायचा आहे. त्यातच आता शिंदे गटातील आमदार, मंत्र्यांची कृत्यही एकनाथ शिंदेना पायउतार करण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. उल्हासनगरमधील माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहायक नंदू ननावरे यांनी पत्नीसह केलेल्या आत्महत्या (Suicide by Nanaware, ex PA of Jyoti Kalani) प्रकरणात एका आमदाराचे आणि एका मंत्र्याचे नाव समोर येताना दिसते आहे. या सगळ्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. या प्रकरणात दोन मंत्र्यांचा सहभाग असल्याचा धक्कादायक आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. ननावरे आत्महत्या प्रकरणातील आरोपी मंत्रिमंडळात आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.

ननावरे पती-पत्नीच्या आत्महत्येनंतर 20 दिवस उलटूनही कोणावरही करावाई झाली नसल्यानं ननावरे यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी साताऱ्यात मंत्री शंभूराजे देसाई यांचं नाव घेत कॅमेरासमोर बोट कापून घेतलं. कारवाई होत नाही तोपर्यंत दररोज शरिराचा एक एक अवयव गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. या व्हिडीओनंतर याचे पडसाद मंत्रालयात कॅबिनेट बैठकीनंतर उमटल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांना जाग आली असून कारवाई सुरु करण्यात आलीय.

(आमदार बालाजी किणीकर यांच्या स्वीय सहायकाला अटक, बडे मासे बाहेर?)

आत्महत्येप्रकरणात आमदाराच्या पीएला अटक

ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणी शिंदे गटाचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांचे पीए शशिकांत साठे, माजी आमदार पप्पू कलानी यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीशी संबंधित कमलेश निकम, नरेश गायकवाड आणि शिंदे गटाचे पदाधिकारी गणपती कांबळे यांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. मात्र, आत्महत्येपूर्वी ननावरे दाम्पत्यानं केलेल्या व्हिडीओत वेगळ्याच चार व्यक्तींची नावं घेण्यात आलेली आहेत. त्यांच्यावर अद्याप कारवाईचा बडगा उचलण्यात आलेल्या नाहीत. तसेच आमदार आणि मंत्रीही यात अडकले जाण्याची शक्यता आहे. मात्र, तपासात केवळ छोटे मासे पकडले जातात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोण होते नंदू ननावरे आणि का केली आत्महत्या

ज्योती कलानी यांचे स्वीय सहायक असलेले नंदू ननावरे यांनी अनेक आमदारांकडे पीए म्हणून काम केलेलं आहे. ज्योती कलानी यांच्या मृत्यूनंतर पप्पू कलानी आणि बालाणी किणीकर यांचं काम ते पाहत असल्याचं सांगण्यात येतंय. ननावरे यांचे मंत्रालयातही अनेक आमदारांसोबत चांगले संबंध होते. साताऱ्यात त्यांच्या जमिनीचा वाद होता, ते प्रकरण हायकोर्टापर्यंत गेलं होतं. मृत्युपूर्वी ननावरे दाम्पत्याचा पाच मिनिटांचा व्हिडीओ समोर आलेला आहे.

काय आहे व्हीडीओत

या व्हिडीओत सातत्यानं होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं कारण त्यांनी दिलंय. या व्हिडीओत फलटणचे संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, दोन देशमुख नावाच्या वकिलांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. निकाळजे याने अंबरनाथमध्ये येऊन राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्याचा उल्लेखही या व्हिडीओत आहे. याचा अधिक तपास पोलिसांनी करावा, असंही यात सांगण्यात आलंय. मुलांना पुढच्या शिक्षणासाठी गावी पाठवण्याची व्हिडीओत मागणी करण्यात आलीय. या व्हिडीओनंतर ननावरे दाम्पत्यानं घराच्या गच्चीवरुन उडी मारुन केली आत्महत्या केली.

आत्महत्येला पंधरा दिवस उलटल्यानंतर कारवाई होत नसल्यानं बोट कापलेल्या धनंजय ननावरे यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन दोषींवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, कारवाई होत नव्हती, तसेच गावात राहणं अवघड झाल्याचं धनंजय ननावरे यांनी म्हटलेलं आहे. आता या प्रकरणात शिंदे गटाचे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai), अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर (MLA Dr Balaji Kinikar), काही राष्ट्रवादीचे नेतेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

(मंत्री शंभुराज देसाई यांच्या नावाचा ननावरे यांनी केलाय उल्लेख)

प्रकरण राजकीय नेत्यांशी संबंधित असल्यानं पोलीस आणि राजकीय नेतेही या प्रकरणात सावध प्रतिक्रिया देत आहेत. ननावरे यांनी व्हिडीओत आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांची नावं घेतलीयेत. तसंच पुरावे घरात काढून ठेवल्याचं सांगितलं होतं. आत्महत्येनंतर ननावरे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त असतानाही दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या घराचं कुलुप तोडण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर, हे दोघेही तिथून पळाले, मात्र ते सीसीटीव्हीत कैद झालेले आहेत.

सत्ताधाऱ्यांत प्रकरणावरुन धुसफूस, संजय राऊत म्हणाले..

या प्रकरणात धनंजय ननावरे यांच्या बोट तोडण्याच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रकरण पुन्हा तापलंय. मंत्रिमंडळ बैठकीनंतर या प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे. शंभूराजे देसाई यांचीही मुख्यमंत्र्यांनी चांगलीच कानउघाडणी केल्याचं सांगण्यात येतंय. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनीही या प्रकरणात देसाईंना जाब विचारल्याची माहिती आहे. आतापर्यंत कारवाईत आमदारांचे पीए आणि काही छोटे राजकीय नेत्यांना अटक झालीय. हे प्रकरण इतकं मोठं असतानाही विरोधक मात्र या प्रकरणात आत्तापर्यंत काहीही बोलताना दिसत नव्हते.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी या प्रकरणात प्रतिक्रिया देताना, या प्रकरणात दोन मंत्री सहभागी असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवं आणि बोट कापून घेतलेल्या भावासोबत गृहमंत्री फडणवीस यांनी चर्चा करुन न्याय द्यायला हवा, अशी मागणीही राऊत यांनी केलीय. या प्रकरणाच्या खोलात गेल्यास आणखी काही बडे मासे हाती लागण्याची शक्यता आहे. जपान दौऱ्यावर असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस परत आल्यावार याबाबत काय पावलं उचलणार, याकडं आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव