Twitter : @NalavadeAnant
मुंबई
बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला असून राज्याच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेतल्यामुळेच जनतेने महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. वर्षा या निवासस्थानी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
वर्षभरामध्ये आम्ही केलेली विकासाची कामे आणि सरकारकडून मिळणारे विविध लाभ लोकांपर्यंत पोहचवल्यामुळेच जनतेने महायुती सरकारला (Maha Yuti government) आपला कौल दिला असल्याचे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
महाविकास आघाडीने थांबवलेली कामे आणि थांबवलेले प्रकल्पांना पुन्हा एकदा चालना देण्याचे काम राज्यातील महायुती सरकारने केले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचे धोरण आम्ही आखले आणि तशी भूमिका घेतली. म्हणून राज्यातील सर्वसामान्य माणूस अगदी शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत, महिलांपासून तरुण वर्गापर्यंत, जेष्ठांपासून कामगारांपर्यंत सर्वांना न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केले. खऱ्या अर्थाने ‘शासन आपल्या दारी’ घराघरात पोहचले असून हेच आपल्या कृतीतून मतदारांनी दाखवून दिले असून प्रेमही व्यक्त केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
आज लागलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये महाविकास आघाडीपेक्षा (Maha Vikas Aghadi) कितीतरी पटीने जास्त सरपंच आणि सदस्य महायुतीचे निवडून आले आहेत. मी मुख्यमंत्री म्हणून आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आमचे सर्व मंत्रिमंडळ यांनी आपापल्या परीने प्रत्येक भागामध्ये जनतेला लोकाभिमुख न्याय देण्याचे काम केले आहे. या यशामध्ये समाजाने सरकारला दिलेले पाठबळ आणि आशीर्वाद याचा वाटा मोठा असल्याचे मतही यावेळी बोलताना व्यक्त केले.
महायुती सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर आमच्यावर दररोज टोमणे, आरोप- प्रत्यारोप करण्यात संपूर्ण वर्ष घालवले. विरोधकांनी आमच्या सरकारवर टीकाटिप्पणी आरोप केला नाही, असा एकही दिवस गेला नाही. ज्या लोकांनी मतदारांशी बेईमानी केली, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, अशा लोकांना जनतेने नाकारले, त्यांना घरी बसवले आणि आमच्या महायुती सरकारला कौल दिला. घरी बसून राज्य चालवता येत नाही, हे लोकांनी आपल्या कौलाद्वारे दाखवून दिले. मतदारांचे आमच्यावर प्रेम आहे, आमच्यावर विश्वास आहे. म्हणून आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही आणखी काम करू. आम्ही महाराष्ट्रात आणखी उद्योगधंदे आणू, तरुणांना रोजगार आणू, त्यांच्या हाती काम देऊ. ही विकासाची घोडदौड पुढे अशीच सुरु ठेवू, कारण कामाचा वेग आम्ही वाढवला आहे. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुतीला असेच यश मिळेल, किंबहुना यामध्ये वाढ होईल आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha elections 2024) ४५ पेक्षा जास्त जागा आम्ही निवडून देऊ आणि पंतप्रधान मोदींचे हात बळकट करू, असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.