Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असून तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू- आळंदी- पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी येथे दिले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. तीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुरेशा वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. एसटी बसस्थानकांच्या इमारतीवर रॅम्पच्या सुविधेसह पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. या आराखड्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेचाही समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच बसस्थानक परिसरातील रस्त्यांसाठी एसटी महामंडळाची ६५२ चौरस मीटर जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी एसटीला जागेच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा नियोजन समितीमधून देऊन जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावी, असेही निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू यांचे भव्य स्मारक (Memorial of Hutatma Rajguru) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी २४८ कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पोलीस वसाहतीसाठी आरक्षित जागेच्या ठिकाणी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत करण्याचा सुधारित आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा. त्याचप्रमाणे पंचायत समितीची जुनी जागा नगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.