मुंबई
ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात ते दाऊद इब्राहिम याचा हस्तक समजला जाणारा सलिम कुत्ता यांच्यासोबत डान्स करीत असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. सलिम कुत्ता प्रकरणात बडगुजर यांची चौकशी सुरू आहे.
दुसरं म्हणजे बडगुजर यांच्यावर पदाचा गैरवापर करून कंपनीला कंत्राट दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीने याप्रकरणी तक्रार दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये बडगुजर महापालिकेत असताना त्यांच्याकडून काही कंत्राट त्यांच्या जवळच्या कंपनीला देण्यात आले होते. या प्रकरणी तपास सुरू होता. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान आज बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपाचं खंडन केलं. सुधाकर बडगुजर यांची नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, शिवसैनिकांवर चुकीच्या केसेस दाखल केल्या जात आहेत. सत्तेचा उन्माद नको, कोणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. यावेळी त्यांनी आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचे सांगितले.
सुधाकर बडगुजर यांची सलग चौथ्या दिवशी चौकशी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता
एसीबीकडूनही चौकशी होणार आहे. बडगुजरांसह अन्य दोघांचीही एसीबीकडून चौकशी केली जाणार आहे. एसीबीने रात्री ७ वाजता नोटीस बजावली होती आणि साडेसात वाजता छापा टाकला, असा आरोप बडगुजर यांनी केला.
दरम्यान आमदार कैलास गोरंट्याल यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. सलीम कुत्ता याचा १९९८ साली मृत्यू झाला होता. रुग्णालयातच त्याची हत्या करण्यात आली होती. छोटा राजनचे हस्तक रोहित वर्मा, बाळू ठाकरे, संतोष शेट्टी यांनी हत्या केली होती. त्यामुळे बडगुजर यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.