नागपूर
आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काळ्या फिती बांधून आंदोलन केलं. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदेत खासदारांचे झालेले निलंबन, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा समाज, ओबीसी समाज जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केले.
याशिवाय आज शेवटचा दिवस असल्याने विरोधकांनी महत्त्वाचे विषय सभागृहात मांडले. आमदार रोहित पवार यांनी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा सभागृहात मांडला. स्पर्धा परीक्षेअंतर्गत नोकऱ्यांचा अर्ज भरताना प्रत्येक परीक्षेसाठी 1 हजार रुपये परीक्षा फी घेतली जाते, याशिवाय वारंवार होणाऱ्या पेपटफुटी प्रकरणावरही रोहित पवारांनी बोट ठेवलं.
काय म्हणाले रोहित पवार…
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर #serious नसल्याचा ठपका सरकारकडून ठेवला जातो, पण वारंवार होणाऱ्या पेपरफुटीविरोधात कायदा करण्यासाठी मात्र ठोस प्रयत्न करत नाही, हे योग्य नाही. शिवाय नोकर भरतीच्या प्रत्येक परीक्षेसाठी 1 हजार रुपये परीक्षा फी उकळणंही योग्य नसल्याचं विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना स्पष्ट केलं.
 
								 
                                 
                         
                            
