पुणे
शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी शिवनेरी ते पुणे असा शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. खा. कोल्हे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला असून शिवनेरीपासून या मोर्चाची सुरुवात झाली.
कांद्यावरील निर्यात बंदी, दुधाचे पडलेले दर या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी याची मागणी केल्याने संसदेतून अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. यानंतर अमोल कोल्हेंनी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला आहे.
अजित पवारांनी अमोल कोल्हेंना शिरूर मतदारसंघातून जिंकून दाखवायचं चॅलेंज दिलं आहे. त्यानंतर कोल्हेंना दडपण आलं आणि त्यांनी हा मोर्चा काढला असं त्यांना यावेळी विचारण्यात आलं. या प्रश्नाचं उत्तर देताना कोल्हे म्हणाले, ‘दादा मोठे नेते आहेत त्यामुळे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने यावर उत्तर देणं योग्य नाही. मात्र हा मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी अजित पवारांनी पाऊलं उचलणं आवश्यक आहे.’
पाहा Video : https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/1088573875487720
विशेष म्हणजे कोल्हेंचा हा मोर्चा बारामतीतील अजित पवारांचं गाव काटेवाडी येथून जाणार असल्याने यावर चर्चा होताना दिसत आहे.
काय आहेत अमोल कोल्हेंच्या मागण्या
- कांद्याची निर्यातबंदी ही कायमची उठवण्यात यावी
- बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा थ्रीफेस लाईट देण्यात यावी
- दुध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावं
- शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज घेताना काही जाचक अटी घातल्या जातात, त्यामुळे हे कर्ज सुरळीत करण्यात यावं.
- शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी प्रयत्न