मुंबई
शिवसेनेकडे किती ताकद आहे हे आपल्याला दिसतंय असा टोका काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी ठाकरे गटाला मारला आहे. दीड वर्षांपूर्वी पडलेल्या फुटीनंतर निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे 2019 चा निकाल हा पॉईंट ऑफ रेफरन्स होऊ शकत नाही असं देखील निरूपम यांनी सुनावलं आहे. राऊतांची स्मरणशक्ती क्षीण झाली असावी, असं म्हणत राऊतांना टोलाही लगावला.
यानंतर राऊतांनीही यावर प्रत्युत्तर दिलं. संजय निरूपम कोण आहे? काँग्रेसचं हायकमांड दिल्लीमध्ये, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू अस म्हणत राऊतांनी या विषयावर जास्त बोलणं टाळलं.
जागावाटपावरुन महाविकास आघाडीत चर्चा सुरू असताना संजय निरूपमांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावेळी निरूपम यांनी प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या प्रस्तावावर मत मांडलं. ते म्हणाले, आंबेडकरांनी जी 12-12-12 ची हिमालयासारखी अट दिली आहे त्याला काही अर्थ नाही.
दुसरीकडे नाना पटोलेंनीही या जागा वाटपाच्या चर्चेत उडी घेतली असून क्रेडिटवर जागा वाटप व्हायला हवं असं म्हटलं आहे.
काय म्हणाले संजय निरूपम?
जागा वाटपात २०१९ च्या संदर्भ देता येऊ शकणार नाही. तेव्हा दोन पक्षांची युती होती. आता तीन पक्ष आहेत. त्यामुळे २३ जागांवर चर्चा आणि जिंकलेल्या १८ जागा हव्यात असा दावा करणं चुकीचं आहे. कारण जिंकलेल्या १८ जागा स्वबळावर जिंकलेल्या नाहीत. तेवढेच खासदार आता तुमच्याकडे नाहीत. त्यामुळे शिवसेनेची ताकद किती हे कोणाला माहीत नाही. सेनेत खूप फाटाफूट झाली आहे. राष्ट्रवादीतही फाटाफूट झाली आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे किती मतं याची गॅरेंटी देता येऊ शकणार नाही. मात्र काँग्रेसकडे किती मतं हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे काँग्रेसला कोणी शिकवायला जाऊ नये.