नांदेड
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं असून २० जानेवारी रोजी मराठा बांधव मोठ्या संख्येने आंतरवालीहून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अनेक राजकीय नेत्यांना मराठा समाजाचा रोष सहन करावा लागत आहे.
अशात काँगेस नेते अशोक चव्हाण हे एका कार्यक्रमासाठी गावात गेले असता तिथे मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी, करत त्यांना विरोध केला. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील इजळी गावात हा प्रकार घडला. अशोक चव्हाण यांचा ताफा उभा असताना मराठा तरुण घोषणा देत होते. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात येण्यास विरोध केला जात असल्याने अशोक चव्हाणांची गाडी अडवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
गावबंदीचा फटका…
मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेतेमंडळींना गावात येऊ नये, असं आवाहन जरांगे पाटलांनी केल्यानंतर राज्यातील गावागावांमध्ये राजकीय नेत्यांसाठी गावबंदी जाहीर करण्यात आली. आणि कोणी गावात प्रवेश करीत असल्यास त्याच्याविरोधात घोषणाबाजी केली जाते.