मुंबई
मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही, याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी कडक भूमिका अवलंबली आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळणार की स्वतंत्र आरक्षण मिळणार, याचीही गुंतागुंत अद्याप सुटलेली नाही.
माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावे या मागणीवर कायम आहेत. दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळू देणार नाही, यावर ठाम भूमिका मांडली. यावर हरिभाऊ राठोड यांनी भुजबळांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘भुजबळांना आरक्षण कळतं का ?’ असा टोला माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा लगावला आहे.
काय म्हणाले हरिभाऊ राठोड
७ जानेवारी २०२४ रोजी ओबीसी महामेळाव्यात मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, काही झालं तरी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळून देणार नाही. परंतु जरांगे पाटील यांची कुणबी म्हणून नोंद मिळाली आहे. ते आता ओबीसीच्या १९% आरक्षणात येणार आहेत. माझा छगन भुजबळ यांना सवाल आहे की, आता कुणबी म्हणून नोंदी मिळणाऱ्या मराठा बांधवांना ते कसे रोखणार? म्हणून मी वारंवार सांगत आहे की, रोहिणी आयोगाच्या नियमानुसार मराठा कुणबी वेगळा प्रवर्ग तयार करून त्यांना वेगळं आरक्षण द्यावे. जेणेकरून सर्वांना सामाजिक न्याय मिळेल इतकी साधी सरळ बाब भुजबळ यांना कळत नसेल, तर भुजबळांना आरक्षण कळते का ? असा सवाल उपस्थित होतो.