पुणे
शिरूर मतदारसंघाची जागा आपण जिंकून दाखवतोच, अशा शब्दात अजित पवारांनी अमोल कोल्हेंना खुलं चॅलेंज दिल्यानंतर आता दोन्ही गटासाठी शिरूर मतदारसंघ प्रतिष्ठेचा झाला आहे. अजित पवार शिरूर मतदारसंघातून कोणाचं नाव पुढे करणार याबाबत चर्चा सुरू असताना त्यांचे पूत्र पार्थ पवारांचं नाव समोर आलं आहे.
आज ९ जानेवारी रोजी पार्थ अजित पवार यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघात दौरा असणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत त्यांच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतरही ते सक्रिय राजकारणात किंवा राजकीय व्यासपीठावरही फारसे दिसले नाही. त्यामुळे त्यांच्या अचानक आखलेल्या दौऱ्यामुळे पार्थ पवार शिरूर मतदारसंघासाठी इच्छूक असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे विभागात शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांच्या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. या कांदा निर्यात बंदी, दुधाचे भाव, शेतकरी कर्जमाफी यांसारखे मुद्दे घेऊन त्यांनी या मोर्चाचं आयोजन केलं होतं.
पहिल्याचं भाषणामुळे पार्थ पवार झाले होते ट्रोल
अजित दादांच्या फटकेबाज भाषणानंतर त्यांचे सुपूर्त्र पार्थ पवार यांच्याकडून सर्वांच्या फार अपेक्षा होत्या. मात्र पहिल्याच भाषणानंतर व्यवस्थित मराठीही बोलता येत नसल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता. ‘चुकामुका’ या शब्दावरुन त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.
अशा परिस्थितीत शिरूर मतदारसंघातून मतदार पार्थ पवारांना स्वीकारेल का? की पुन्हा अमोल कोल्हेंवरच शिक्कामोर्तब होईल, हे येत्या काही दिवसात समोर येईल.