X: @therajkaran
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका…..!
ज्यांनी आपल्या राक्षसी आकांशेपोटी वंदनीय बाळासाहेबांचे विचार विकले, विचारांना तीलाजली दिली, ज्यांनी आपल्या हयातीत काँग्रेसला कधीच जवळ घेतले नाही, त्याचं काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता काबीज करून मुख्यमंत्री पद उपभोगले ते पाहता जी अवस्था अहंकारी रावणाची झाली तीच अवस्था यांची होईल, अशी जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेब भवन या मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयांत आज सकाळी बाळासाहेबांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करून नंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली.
२०१९ ला ज्यांनी एकाबरोबर निवडणूका लढवून त्या जिंकल्या मात्र सरकार दुसऱ्याच बरोबर स्थापन करून त्यांनी आपल्या असूरी भुकेचे प्रदर्शन मांडले त्या सत्तेच्या लालसेपोटी ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली त्यांना प्रभू श्री राम सुबुद्धी देवो अशा प्रखर शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता सणसणीत टोलाही लगावला.
राज्याच्या हितासाठीच आम्ही महा विकास आघाडी चे सरकार उलथवून जनतेचे सरकार स्थापन केले. आज तेच आम्हाला रावण म्हणत आमचा विरोध करत असले तरी राम कोण आणि रावण कोण हे जनतेला माहीत आहे.ज्यांनी राममंदिराला विरोध केला, प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला त्यांना रामाबद्दल बोलण्याचा काही एक अधिकार नाही. जो राम का नही वह किसी काम का नही, अशा काहीशा खोचक शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांचा समाचार घेतला.
वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन त्यांच्या विचारांना अभिप्रेत सरकार आम्ही स्थापन केले.सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा तसेच आरोग्य व स्वच्छता हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असायचे.त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही समाजातील सर्व घटकांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असो, वां मुंबई शहरातील महानगर पालिका राबवत असलेली शून्य कचरा मोहिम असो, की शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम यात आम्ही सर्वच समाज घटकातील वर्गाला अत्याधुनिक सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून प्रामाणिकपने अहोरात्र काम करीत आहोत, असे सांगत अयोध्येमध्ये राममंदिर व्हावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते.अयोध्येमध्ये राममंदिर पूर्ण झाले आणि काल २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण होऊन बाळासाहेबांचे स्वप्न पूर्णत्वास आले. मुख्य म्हणजे त्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी राममंदिराचे लोकार्पण झाले, ही बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरल्याचे सांगत आज बाळासाहेबांची जयंती ही प्रत्येक शिवसैनिकांसाठी आनंदाचा क्षण आहे . त्यामुळे आजच्यादिवशी मुंबईतील प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेतर्फे ११ हजार दिवे प्रज्वलित केले जाणार आहेतच पण संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत, अशीही माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
मराठा समाजाने संयम बाळगावा…….
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आणि सकारात्मक आहे.ओबीसी समाज आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार आहोत. ही सरकारची जबाबदारी आहे.संपूर्ण मागासवर्ग आयोग त्यासाठी २४ तास तीन शिफ्टमध्ये दीड लाख लोक काम करत आहेत. गोखले इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिटयूट त्यासाठी काम करत आहेत.आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा सरकार करणार आहे. ही आमच्या सरकारची जबाबदारी आहे. हा शब्द सरकारने दिलेला आहे. सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा समाजानेही आंदोलनाची भूमिका अधिक ताणून न धरता थोडा संयम बाळगावा आणि राज्य सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना केले.