मुंबई
महाविकास आघाडीच्या बैठकी आज पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती लावली. बैठक संपल्यानंतर बाहेर आल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाशझोत टाकला. मविआतील घटकपक्ष पुढील टप्प्यात जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा करतील. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यात आम्ही किमान समान कार्यक्रमावर चर्चा करत आहोत. ही चर्चा आज अर्धवट राहिली. त्यावर पुढील बैठकीत चर्चा होईल, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले
आमच्यात काही मुद्यांवर एकमत झाले नाही तरी आम्ही आपल्या वाटा वेगळ्या वाटा करायच्या नाही असा निर्धार केला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीची गत इंडिया आघाडीसारखी होऊ देणार नाही, अशा शब्दात आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली. आज शुक्रवारी मुंबईतील ट्रायडन्स हॉटेलात मविआची बैठक पार पडली. या बैठकीला वंचितच्या प्रकाश आंबेडकरांसह इतर तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
आता इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही…
आता इंडिया आघाडी शिल्लक राहिली नसल्याचा दावा आंबेडकरांनी केला. त्यामुळे मविआतील घटकपक्षांनी शांततेत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मविआतील घटकपक्षात काही मुद्द्यांवर एकमत झालं नाही तरी वेगळ्या वाटा केल्या जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपने मला यापूर्वीच ऑफर दिल्याचा पुनरुच्चारही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी त्यांच्या बाजूला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.