मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना बेकायदेशीर घोषित केली असून त्यावर बंदी घातली आहे. निवडणूक रोखे हे माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे. एक “घटनाबाह्य” योजना माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. आता महाराष्ट्राला आशा आहे की, इथली घटनाबाह्य राजवट पण अशीच रद्द केली जाईल. निवडणूक रोख्यांची अपारदर्शक योजना रद्द करण्याच्या आजच्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो. आता आम्हाला आशा आहे की ह्यापुढे पारदर्शकता बाळगली जाईल आणि आदेशातील प्रत्येक शब्द वेळेत पाळला जाईल, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, यापुढे मतदारांना पक्षाच्या निधीबाबत जाणून घेण्याचा अधिकार असेल. बॉण्ड खरेदी करणाऱ्यांची यादी सार्वजनिक करावी लागेल असंही यावेळी न्यायालयाकडून सांगण्यात आलं.
सीजेआय डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे.