नवी दिल्ली
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानावर सीबीआयने आज (२२ फेब्रुवारी) छापा टाकला. याशिवाय दिल्लीतील अन्य 29 ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहेत. किरू जलविद्युत प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत ही कारवाई करण्यात आली. सत्यपाल मलिक यांनी त्यांच्या राज्यपालपदाच्या काळात एका जलविद्युत प्रकल्पाच्या दोन फायली निकाली काढण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा दावा केला होता.
यापूर्वी 6 जुलै 2022 रोजी किरू जलविद्युत प्रकल्पासंदर्भात देशभरात 16 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. गुरुवारी छापा टाकल्यानंतर मलिक यांनी एक्सवर पोस्ट करत मी शेतकऱ्याचा मुलगा असून छाप्याला घाबरणार नाही, असे सांगितले.
मलिक यांनी २०२१ मध्ये भ्रष्टाचाराचे केले होते आरोप
सत्यपाल मलिक यांनी 17 ऑक्टोबर 2021 रोजी राजस्थानमधील झुंझुनू येथे एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना कोट्यवधींची लाच देऊ करण्यात आली होती. त्यादरम्यान दोन फाईल्स त्यांच्याकडे आल्या होत्या. त्यापैकी एक मोठा उद्योगपती आणि दुसरा मेहबुबा मुफ्ती आणि भाजप आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या व्यक्तीचा होता. त्यात घोटाळा झाल्याचे त्यांच्या सचिवांनी सांगितल्यानंतर त्यांनी दोन्ही सौदे रद्द केल्याचे मलिक यांनी सांगितले होते.
दोन्ही फायलींसाठी आपल्याला 150-150 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असेही मलिक म्हणाले होते. मलिक म्हणाले, ‘मी पाच कुर्ता-पायजमा घेऊन आलो आहे आणि तेच घेऊन निघेन. सीबीआयने विचारल्यावर मी ही ऑफर देणाऱ्यांची नावंही सांगेन.