मुंबई : आमदार रोहित पवारांवर ईडीकडून (ED action against Rohit Pawar) जी कारवाई सुरू आहे, तशीच कारवाई अजित पवारांवर झाली होती. मात्र त्यांनी गुडघे टेकले आणि ते भाजपमध्ये पळून गेले. प्रफुल पटेल यांचे इक्बाल मिरचीशी (Iqbal Mirchi) संबंध असल्याचे पुरावे ईडीने दाखवले होते. त्यानंतर तेही भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये गेल्यानंतर त्या दोघांवरील कारवाई थांबली. अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्यातही तेच झालं अन् कारवाई थांबली. पण अनिल देशमुख (Anil Deshmukh), रोहित पवार आणि मी अन्य लोक झुकले नाही. आम्ही कोणापुढे नतमस्तक झालो नाही. त्यांच्या पायाशी बसायला तयार झालो नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने महायुतीवर निशाणा साधला.
रोहित पवार सातत्याने यंत्रणेशी लढा देत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचा छळ केला जात असून वारंवार तपासासाठी बोलावलं जात आहे. रोहित पवारांनी असा काय गुन्हा केला आहे? उद्योग आणि व्यवहारात लहान-सहान गोष्टी मागेपुढे झाल्या असतील. त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करणं कितपत योग्य आहे? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. रोहित पवार कुठेही जाणार नाहीत. ते आजोबांसोबत ठाम राहतील, असंही ते यावेळी म्हणाले.
रोहित पवारांवर कारवाई
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ५० कोटी २० लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो आणि अन्य कंपन्यांनी संगनमताने संशयास्पद व्यवहार करून तोट्यात गेलेले साखर कारवाने लिलावाद्वारे खरेदी केल्याचा आरोप आहे. कन्नड सहकारी साखर कारखानाही रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने ५० कोटी रुपयांना खरेदी केला. एसएसके खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा कुठून आला, याचाही ईडीकडून तपास सुरू आहे.