X: @therajkaran
देशातील आगामी निवडणुका निष्पक्ष पार पाडव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ६ राज्यांतील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनाही पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाने नुकताच आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) आणि ४ राज्यातील विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) कार्यक्रम जाहीर केला. त्यावेळी निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी आगामी निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलले जातील, असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने देशातील निवडणुका निष्पक्ष पार पडाव्यात, यासाठी गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ६ राज्यांतील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश जारी केले. यासोबतच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागातील सचिव आणि पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालकांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने इक्बाल सिंह चहल यांच्यासह मुंबई महापालिकेचे (BMC )अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांनाही हटवले आहे. याशिवाय, जीएडी मिझोरामचे सचिव आणि हिमाचल प्रदेशचे सचिव यांनाही हटवले, जे संबंधित मुख्यमंत्री कार्यालयात पदभार सांभाळत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, तीन वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांची बदल करण्यात येते. चहल यांचा कार्यकाळ तीन वर्षांपेक्षा जास्त झाला होता. मात्र, अपवाद म्हणून त्यांची बदली करण्यात येऊ नये, म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. परंतु, निवडणूक आयोगाने त्यांची विनंती मान्य केली नाही. त्यानंतर आज निवडणूक आयोगाच्या आदेशावरून आज चहल यांना पदावरून हटवण्यात आले आहे.