X: @therajkaran
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 20 मतदारसंघातील उमेदवारांची यादी याआधीच जाहीर केली आहे. या यादीत माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक- निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते – पाटील (Dhairyasheel Mohite -patil) नाराज असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत ते पुन्हा शरद पवार (Sharad pawar) यांच्या राष्ट्रवादीत परत येणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोहिते – पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. बंद दाराआड बैठक सुरू असताना मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी माढा आणि निंबाळकरांना पाडा, अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्याशिवाय त्यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याची मागणीही मोहिते – पाटील यांच्याकडे केली आहे. दुसरीकडे रामराजे नाईक – निंबाळकर यांच्यासह अन्य नेत्यांची मोहिते – पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा ते शरद पवार यांच्या गटात जाणार अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.
दरम्यान, काही नेत्यांनी त्यांनी शरद पवारांच्या पक्षातून उमेदवारी घ्यावी, अशी मागणी केली आहे. माढा लोकसभा उमेदवारीमुळे सुरु झालेला वाद आता भाजपाची (BJP) डोकेदुखी बनण्याची शक्यता आहे. रणजित – निंबाळकरांचं तिकीट जर कापलं नाही तर मोहिते – पाटील यांच्या नाराजीचा फायदा शरद पवार गट उठवण्याच्या तयारीत आहे. निर्णय कायम ठेवला तर मोहिते – पाटील नाराज होणार आणि जर तिकीट बदलून दिले तर राज्यात, देशात अनेक ठिकाणी सुरु असलेल्या वादाला असेच स्वरूप प्राप्त होईल, अशा कात्रीत भाजप सापडला आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात कोणाला उतरवायचं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.