X: @therajkaran
आम आदमी पक्षाचे जेष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय कारणास्तव बाहेर असणाऱ्या जैन यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला असून त्यांना ‘तात्काळ आत्मसमर्पण’ करण्यास सांगितले आहे.
सत्येंद्र जैन यांना मे २०२२ मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी २६ मे २०२३ रोजी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. यानंतर त्यांच्या अंतरिम जामिनात अनेकदा वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली आणि ताबडतोब आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणातील सहआरोपी अंकुश जैन आणि वैभव जैन यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
दरम्यान, सत्येंद्र जैन यांना ईडीने ३० मे २०२२ रोजी शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैशांची लाँड्रिंग केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर निधीतून जमीन खरेदी केल्याप्रकरणी अटक केली होती. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आप नेत्याच्या कुटुंबाशी संबंधित ४.८१ कोटी रुपयांची संपत्ती तपास संस्थेने जप्त केली होती. या कारवाईनंतर एका महिन्यात त्यांना अटक करण्यात आली होती. सत्येंद्र जैन यांच्यानंतर ईडीने दिल्ली दारू धोरण घोटाळ्यात मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आणि संजय सिंह (Sanjay Singh) यांनाही अटक केली. याशिवाय ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनाही या प्रकरणात चौकशीसाठी 9 वेळा समन्स पाठवले आहेत. केजरीवाल अद्याप तपास यंत्रणेसमोर हजर झालेले नाहीत. यासंदर्भात दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू कोर्टातही सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने केजरीवाल यांना दिलासा देत जामीन मंजूर केला.