महाराष्ट्र

धानाला २५ हजार बोनस देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विदर्भात आश्वासन

महायुतीचे उमेदवारांसाठी बाळापूर, भंडारामध्ये प्रचार सभा

महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. आपण देणारे आहोत विरोधक घेणारे होते. पूर्वी सरकार धानाला १५००० रुपये बोनस द्यायचे, महायुतीने बोनस २०००० पर्यंत वाढवला होता, आता पुन्हा सरकार आले की इथल्या शेतकऱ्यांच्या धानाला २५००० रुपये बोनस देणार, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. भंडारा येथे महायुतीचे उमदेवार नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

महायुतीच्या धडाकेबाज योजनांमुळे विरोधकांची तोंड काळवंडली आहेत, आपल्या सगळ्या योजना त्यांनी ढापल्या, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. एकीकडे लाडकी बहिण योजनेला विरोध करायचा आणि दुसरीकडे वचननाम्यात त्याच योजनांचा समावेश करायचा अशा विरोधकांना लाडक्या बहिणी निवडणुकीत नक्की जोडा दाखवतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी उठाव केला आणि सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आणून दाखवले. जनतेने युतीला निवडून दिले, मात्र त्यांनी मतदारांशी बेईमानी केली, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. सत्ता सोडण्याची हिम्मत आम्ही दाखवली. बाळासाहेबांचे विचार मोडले-तोडले जात होते. ‘उबाठा’ने काँग्रेसकडे गहाण टाकलेला पक्ष सोडवला. आता शिवसेना पक्ष हा नेत्यांचा नाही तर सामान्य कार्यकर्त्यांचा आहे. जो काम करणार तो पुढे जाणार, असे ते म्हणाले.

अडीच वर्षात महाविकास आघाडीने प्रकल्प बंद पाडले. समृद्धी मार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो कारशेड, मराठवाडा वॉटर बंद, विदर्भातील सिंचन योजना, जलयुक्त शिवार अशा योजना त्यांनी बंद पाडल्या. पण जसे आपले सरकार आले तसे स्पीडब्रेकर काढून टाकले. महायुतीकडे विकासाचा अजेंडा आहे. एकदा दिलेला शब्द मागे घेत नाही.विकासाची गाडी वेगाने धावायला लागली. १२४ सिंचन प्रकल्पाला मंजुरी दिली. मविआ सरकारच्या काळात केवळ चार प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

धनुष्यबाण उचलायला मनगटात ताकद लागते
बाळापूर येथील महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर घणाघाती टीका केली. काहीजण शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरला असे लहान मुलांसारखे काय रडताय. तुम्ही काय झोपले होते का, धनुष्यबाण उचलायला मनगटामध्ये ताकद लागते. सत्ता सोडायला हिंमत लागते ती माझ्यासह ७ ते ८ मंत्री आणि ५० आमदारांनी दाखवली. सत्ता सोडली आणि शिवसेना वाचवली, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात