मुंबई : सांताक्रूझ पूर्व येथील आर्या इंटरनॅशनल हॉटेलवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न हॉटेल व्यवस्थापनाच्या सतर्कतेमुळे अयशस्वी ठरला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
आर्या इंटरनॅशनल हॉटेलचे प्रमुख अशोक शेट्टी आणि पृथ्वीराज शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग नावाच्या एका आरोपीसह काही साथीदारांनी हॉटेलात प्रवेश करून काही रुम्स बुक केल्या. त्यानंतर त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना धमकावणे, संगणक आणि अन्य सामान बळजबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. काही कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचीही माहिती समोर आली आहे.
यावेळी हॉटेल व्यवस्थापनाने प्रसंगावधान राखत १०० क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली. वाकोला पोलिस ठाण्याचे अधिकारी प्रविण कराडे आणि श्री. खांडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले.
या घटनेमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी अशा समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करून व्यवसायिकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
वाकोला पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.