मुंबई: ‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊत लवकरच साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दर्याचं पाणी’ या कोकणी गाण्यात एकत्र झळकणार आहेत. नुकताच त्यांनी या गाण्याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला असून, प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या गाण्याचे चित्रीकरण अलिबागच्या सुरम्य समुद्रकिनारी करण्यात आले आहे. संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी हे गाणे गायले असून, श्रद्धा दळवी यांनी गीतलेखन केले आहे. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला अमेय मुळे यांनी संगीत दिले आहे.
कोकणचा जावई म्हणून ओळखला जाणारा अभिनेता किरण गायकवाड या गाण्याच्या अनुभवाबद्दल म्हणतो,
“खूप दिवसांपासून इच्छा होती की, एकदा तरी कोकणी गीतात काम करावं. दिग्दर्शक विजय बुटे यांनी जेव्हा या गाण्याची संकल्पना सांगितली, तेव्हा मी प्रचंड उत्सुक होतो. कोळी गेटअपमध्ये नाचण्याचा आनंद काही औरच होता. विशेष म्हणजे, समुद्र हा माझा आवडता विषय असल्यामुळे दिवसभर समुद्रकिनारी शूटिंग करताना मज्जा आली. आता सोशल मीडियावर माझ्या कोळी लूकला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिक्रिया मिळत आहेत, त्यामुळे खूपच आनंद झाला.”
‘दर्याचं पाणी’ या कोकणी गाण्याचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची या गाण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. लवकरच हे गाणे रसिकांच्या भेटीला येणार असून, किरण गायकवाडच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.