नाशिक : “सामाजिक संवेदनशीलता राखून सर्वसामान्य रुग्णांची सेवा करा. वैद्यकीय क्षेत्रात मोठे यश मिळवले तरी समर्पण भाव टिकवून ठेवा. महिन्यातून एक दिवस शासकीय रुग्णालयात सेवा द्या,” असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 24व्या दीक्षांत समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. बी. एन. गंगाधर, कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल पुढे म्हणाले, “आरोग्य सेवा करताना कधीही आशा सोडू नका. कोविड काळात डॉक्टर व नर्सेसने सैनिकांसारखी लढाई दिली. आरोग्य शिक्षण घेताना केवळ ज्ञान नव्हे, तर सामाजिक बांधिलकीही जोपासा.”
मंत्री हसन मुश्रीफ यांनी “रुग्णसेवा ही परमेश्वराची सेवा” असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना नैतिकतेसह कार्य करण्याचा सल्ला दिला. त्यांनी वैद्यकीय शिक्षणाच्या आधुनिकरणावर भर दिला आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने प्रवेशक्षमतेत 1,000 जागांची वाढ केल्याबद्दल आभार मानले.
डॉ. बी. एन. गंगाधर यांनी “आरोग्य सेवा केवळ उपचार नव्हे, तर रुग्णांशी भावनिक नाते जपणेही महत्त्वाचे आहे” असे सांगितले. त्यांनी डिजिटल शिक्षण आणि योगा-ध्यानाचा महत्त्व पटवून दिला.
डॉ. माधुरी कानिटकर यांनी “विद्यार्थ्यांनी कौशल्य शिक्षणावर भर द्यावा. विद्यापीठाने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ अंतर्गत विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ‘कुलगुरु कट्टा’ उपक्रम विद्यार्थ्यांशी थेट संवादासाठी सुरू करण्यात आला आहे,” असे सांगितले.
दीक्षांत समारंभात 8,547 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, तर 139 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके मिळाली. पीएच.डी.साठी 15 विद्यार्थ्यांची निवड झाली. राज्यपालांच्या हस्ते ‘नर्सिंग ब्लू प्रिंट करिक्युलम’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.