पुणे : पुण्यासारख्या एकेकाळी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून, महिलांसाठी हे शहर असुरक्षित बनत चालले आहे. शिवशाही बसमध्ये घडलेली बलात्काराची घटना ही राज्यात वाढलेल्या गुंडशाहीचे गंभीर संकेत असल्याचे मत आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केले आहे.
स्वारगेट परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे पुणेकरांमध्ये तीव्र संताप असून, स्थानिक प्रशासन आणि गृहखाते यांची संपूर्णपणे अपयशी ठरत असल्याची टीका करण्यात येत आहे. हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन, प्रवासी, आणि एसटी महामंडळाची सुरक्षा व्यवस्था असतानाही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुंड निर्भयपणे असे कृत्य करत असतील, तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
“महिला आयोग व प्रशासन अपयशी” – मुकुंद किर्दत
यासंदर्भात आप नेते मुकुंद किर्दत, सुनीता काळे आणि सईद अली यांनी स्वारगेट येथे पाहणी केली. तसेच या घटनेवर प्रतिक्रिया मिळवण्यासाठी महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना जाब विचारण्यासाठी पोहोचले असता त्या स्वतःची गाडी स्थानकात न आणता पोलिसांच्या मदतीने निघून गेल्या, असा आरोप मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
“महिला आयोगाकडून प्रतिक्रिया येतात, घटना घडल्यावर नीलम गोऱ्हे भेट देऊन जातात, पण याने गुन्हेगारी थांबत नाही. पुणे शहरात पोलिसांचा आणि प्रशासनाचा वचकच राहिलेला नाही. गेल्या दोन वर्षांत कोयता गँग, मंगळसूत्र चोरी, बलात्काराच्या घटना आणि अपघात वाढले आहेत. पुणे हे गुन्हेगारीचे शहर बनू लागले असून, वर्दळीच्या स्वारगेट स्थानकात असा प्रकार घडणं लज्जास्पद आहे,” असे किर्दत म्हणाले.
गुन्हेगारी वाढली, सरकार शांत?
पुण्यासारख्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानीत अशा घटना वारंवार घडत असतील, तर पालकांनी आपल्या मुलींना येथे सुरक्षित समजायचे तरी कसे? पुण्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णतः कोलमडली असून, सरकार याकडे डोळेझाक करत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.