पुणे : स्वारगेट बस स्थानकात गावाकडे जाणाऱ्या एका युवतीवर बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली असून, या प्रकाराने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. भाजप महिला प्रदेशाध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.
या संदर्भात त्यांनी म्हटले की, “पोलीस यंत्रणा सक्षम असून आरोपींचा शोध सुरू आहे. याआधीही या आरोपींवर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून, हा हरामखोर आरोपी लवकरच गजाआड होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आ. वाघ यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा आणि नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे असे सांगितले. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थिनी आणि युवतींना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी शंका आली तरी पोलीस हेल्पलाइन 112 वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ST डेपो आणि रेल्वे यार्ड येथे अधिक CCTV बसवण्याची आणि सुरक्षा व्यवस्था तपासण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्यावर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्यांनी जर कर्तव्यात कसूर केली असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी एस टी महामंडळाकडे केली आहे.
या घटनेनंतर महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत असे मत त्यांनी मांडले. “महाराष्ट्रातील महिलांना आणि युवतींना संपूर्ण सुरक्षा मिळेल, यासाठी आपण सर्वजण सतर्क राहूया,” असे आवाहन करत त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.