मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब जवळ उभारण्यात येणाऱ्या नवीन जेटीचे काम अत्याधुनिक आणि सर्व सोयींनी युक्त असावे, अशी सूचनावजा निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी येथे संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्री राणे यांनी आज प्रत्यक्ष रेडिओ क्लब येथे जाऊन जेटीच्या उभारणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता पी. प्रदीप, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढिये, मुख्य अभियंता राजाराम पुरी गोसावी, मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन खरा, मुख्य सागरी अभियंता प्रकाश चव्हाण, अधीक्षक अभियंता श्रीकांत बांगर आदी अधिकारी उपस्थित होते.
रेडिओ क्लब येथील जेट्टी प्रवासी वाहतूक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले, “या जेटीचे काम दर्जेदार आणि उच्च गुणवत्तेचे असावे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व शासकीय परवानग्या तातडीने मिळवाव्यात. तसेच, हे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी.”
त्यांनी असेही स्पष्ट केले की, सध्याच्या जेटीवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने नवीन जेटी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे हे काम त्वरित आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
रेडिओ क्लब येथे प्रवासी आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक टर्मिनल इमारतीसह विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. या सुविधांमध्ये:
• टर्मिनल प्लॅटफॉर्म: ८० मीटर बाय ८० मीटर
• टर्मिनल इमारत: आधुनिक सोयींनी युक्त
• जेटी: २१४ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद
• अँफिथियेटर: ३५० लोकांची बसण्याची व्यवस्था
• प्रतीक्षालय आणि प्रसाधनगृह
• पाणपोई आणि अग्नी सुरक्षा प्रणाली
• सीसीटीव्ही यंत्रणा इत्यादींचा समावेश असेल.
यावेळी मंत्री राणे यांनी संपूर्ण गेट वे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब परिसराची पाहणी केली आणि कामाच्या सध्याच्या स्थितीची सविस्तर माहिती घेतली. तसेच, ही जेटी पूर्ण झाल्यानंतर प्रवासी वाहतूक आणि पर्यटन उद्योगाला मोठा फायदा होणार असून, मुंबईतील समुद्र पर्यटनासाठी हे एक महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.