उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई – राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी कटीबद्ध आहे, आणि येत्या दोन वर्षांत म्हाडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
आज पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाच्या घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीएसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३,६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वसतिगृहाची उभारणी केली जाणार आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या ३,६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी ७१,६४२ अर्ज प्राप्त झाले असून, या अर्जदारांनी म्हाडावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, घरांच्या गुणवत्ता आणि सोडतीच्या पारदर्शकतेमध्ये कुठेही तडजोड न करता विजेत्या अर्जदारांना तात्काळ सदनिकांचा ताबा देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हाडाच्या कार्याची प्रशंसा करत सांगितले की, गेल्या दीड वर्षात १३ सोडतींच्या माध्यमातून सुमारे ३० हजार घरे उपलब्ध करून दिली गेली आहेत. तसेच रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लागावेत आणि झोपडपट्टी पुनर्विकास होवो यासाठी राज्य सरकारही प्रयत्नशील आहे, असे ठामपणे नमूद केले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, ही संगणकीय सोडत प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाविना आणि पूर्णपणे ऑनलाइन प्रणालीद्वारे पार पडत असून, अर्जदारांची नोंदणी आणि पात्रता निश्चित झाल्यानंतर त्यांना सोडतीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार मिळतो. विजेत्या अर्जदारांना तात्काळ सूचना पत्र पाठविण्यात येते, आणि त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर देकार पत्र दिले जातात. त्यांनी म्हाडा लाभार्थ्यांना म्हाडाचे ब्रँड अँबेसिडर मानले आणि सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी शासन कटीबद्ध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
पुणे मंडळाने मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध करून दिल्याबद्दल पुणे म्हाडाचे सभापती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याचे मुक्तकंठाने कौतुक केले.
सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या अधिकृत यूट्यूब व फेसबुक समाजमाध्यम व्यासपीठांवरून करण्यात आले, ज्याला ४८,००० जणांनी पाहिले. तसेच विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या वेबसाइटवर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.